नांदेड(प्रतिनिधी)-आयपीएल क्रिकेटचे शेवटचे तीन सामने शिल्लक असतांना कुंटूर पोलीसांनी त्यांच्या हद्दीत चालणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टाचालकाला गजाआड केले. नांदेड जिल्ह्यात 36 पोलीस ठाणे आहेत. 35 मध्ये यावर्षी आजपर्यंत कोठेही क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला नाही. म्हणजे आयपीएलच्या सटट्याचा अड्डा सुरूच नसेल यावरून आयपीएल क्रिकेट आणि त्यावरील सट्टा याबाबत नांदेड जिल्ह्यात राम राज्य असल्याचे चित्र दिसत आहे.
दोन दिवसांपुर्वी आयपीएलच्या गुजराथ विरुध्द राजस्थान या सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या कहाळा गावातील एकाला कुंटूर पोलीसांनी पकडले. त्याच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील शिक्षा ज्या पध्दतीच्या आहेत. त्या पध्दतीच्या अनुरूप तो आता पुन्हा घरी आला असेल. अजुनही दोन क्रिकेट सामने शिल्लक आहेत. त्यावरही सट्टा चालणारच. नांदेड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र तसेच भारत देश या सर्वच ठिकाणी हा सट्टा अत्यंत बेमालुमपणे सुरू होता, आहे आणि राहणारच.
नांदेड जिल्ह्यात एकूण 36 पोलीस ठाणे आहेत. जवळपास 4 हजार पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार असे मोठे संख्याबळ पोलीस विभागाकडे आहे. तरी पण कुंटूर वगळता कोणत्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयपीएल जुगार अड्ड्यावर छापा पडला नाही. बहुदा नांदेड जिल्हा पोलीस दलाची भिती एवढी जास्त असेल की, आयपीएल सट्टा चालविणाऱ्यांची हिंमत झाली नसेल. असे असेल तर नांदेड जिल्ह्यात राम राज्य सुरू आहे असेच म्हणावे लागेल.
त्याशिवाय दुसऱ्याही कांही बाबींची चर्चा आता दोन सामने शिल्लक असतांना सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आयपीएल सट्टा चालकांना अधिकाऱ्यांनी बोलावले तर आता तर सर्व कांही संपले आहे आता काय ? असा प्रश्न आयपीएल सट्टा चालक विचारत आहेत. पुर्वी झालेल्या घडामोडी आणि देवाण-घेवाणीतून उर्वरीत दोन सामन्यांना आयपीएल सट्टा चालक सोडणार नाहीतच आणि म्हणूनच ते पोलीसांच्या बोलवण्याला प्रतिसाद देत नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे. असो यंदाचा आयपीएल हंगाम मात्र संपलाच. पुढच्या आयपीएल हंगामात कोणते पोलीस अधिकारी नांदेड जिल्ह्यात राहतील किंवा नाही राहतील म्हणून नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांवर या आयपीएल सट्टा जुगाराला चालू द्यायचे की नाही हे ठरेल. एकूणच पोलीसांनी आयपीएल हंगाम यशस्वी रितीने कोणतेही आरोप न होता पार पाडला याबद्दल नांदेड जिल्हा पोलीस दलाचे कौतुकच करायला हवे.
