ई-बाईक्समध्ये अनाधिकृत बदल असतील तर गुन्हे दाखल होणार
नांदेड(प्रतिनिधी)-देशात आणि राज्यात ई-बाईक्स वापराबाबत कायद्याच्याविरोधात बऱ्याच बाबी घडत आहेत. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 26 व 27 रोजी विशेष तपासणी मोहिम राबवली जाणार आहे. त्यात महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण-2021 च्या विरोधात वागणारे ई-बाईक्स विक्रेता, उत्पादक आणि नागरीक यांनी आपल्या ई बाईकमध्ये केलेले बेकायदेशीर बदल दुरूस्त करून घ्यावेत नसता तपासणी दरम्यान त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल होणार आहेत असे प्रसिध्दी पत्रक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पाठवले आहे.
महाराष्ट्र शासनाने पर्यावरण पुरक धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण-2021 लागू केले. ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100 टक्के सुट दिलेली आहे. आजपर्यंत राज्यात 66 हजार 482 दुचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे आणि 887 वाहनांची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमात बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली आहे. त्यानुसार 250 व्हॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा 25 किलो मिटर पेक्षा कमी आहे अशा ई-बाईक्सना वाहन नोंदणीपासून सुट दिली आहे.
तरी असे निदर्शनास आले आहे की, कांही वाहन उत्पादक मान्यता प्राप्त संस्थेने दिलेल्या प्रमाणपत्राशिवाय ई-बाईक्सची विक्री करत आहेत. तसेच ई-बाईक्स उत्पादन करण्याची मान्यता ज्यांना मिळाली आहे. ते त्यामध्ये बेकायदेशीर बदल करून वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅट पेक्षा जास्त करतात आणि वाहनाची वेगमर्यादा तासी 25 किलो मिटरपेक्षा अधिकची करतात. यामुळे रस्ता सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच ई-बाईक्सना आग लागून दुर्घटना घडलेले बरेच प्रकार आहेत.
त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकाने 23 व 24 मे रोजी 36 ई बाईक्सची तपासणी केली. त्यामध्ये 8 वाहने दोषी आढळून आली. त्यातील 4 वाहने जप्त करण्यात आली. नांदेड शहरात ई-बाईक्सची विक्री करण्यासाठी एकूण 8 वाहन वितरकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अधिकृत व्यवसाय प्रमाणपत्र घेतलेले आहे.
वाहन उत्पादक, वितरक व नागरीक यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आवाहन केले आहे की, ई बाईक्समध्ये अनाधिकृत बदल करू नये. केले असतील तर ते पुर्ववत करून घ्यावेत यासाठी 26 व 27 मे रोजी जिल्ह्यात एक विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये संबंधीत वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहन धारक यांच्याविरुध्द अनाधिकृत बदल आढळला तर मोटार वाहन कायदा 1988 आणि भारतीय दंड संहिता यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. ज्या ई-बाईक्स वितरकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्यवसाय प्रमाणपत्र घेतलेले नाही त्यांनी त्वरीत ते घ्यावेत असे आवाहन केले आहे.
