ताज्या बातम्या नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेने पकडला तोतया वन अधिकारी

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवर फिरून वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक असे बनावट ओळखपत्र वापरून आणि अधिकार नसतांना तसा गणवेष वापरून अनेकांना फसवणाऱ्याला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे,सहायक पोलीस उप निरीक्षक श्री गोविंदरावजी मुंढे सहकारी पोलीस अंमलदार श्री दशरथजी जांभळीकर,गणेश धुमाळ आणि विलास कदम हे २४ मे रोजी खाजगी गाडीने शहरात गस्त करीत असतांना त्यांना अत्यंत गुप्त माहिती मिळाली की,नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लातूर फाटा चौक,दूध डेअरी रोडवर एक बोगस.तोतया वन परिक्षेत्र अधिकारी असा गणवेश परिधान करून आणि तसे बनावट ओळखपत्र धारण करून थांबलेला आहे.तेव्हा दत्तात्रय काळे यांनी प्राप्त झालेली माहिती आपले पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिली.त्यांनी सांगितल्या प्रमाणे काळे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी दूध डेअरी जवळ पोहचले.तेथे एक माणूस वन विभागाचा गणवेश परिधान करून उभा होता.कमरेवर परिधान केलेल्या बेल्ट मध्ये वन विभागाचा लोगो होता.त्याच्या कमरेवर वन विभागाचे ओळखपत्र फिरते पथक असे अडकवलेले होते.एक दुचाकी होती त्यावर सुद्धा वन विभागाचा लोगो लावलेला होता. त्याच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असतांना त्याचे नाव कपिल गणपत पाईकराव (३२) रा.निवघा बाजार ता.हदगाव असे होते. याबाबत पोलिसांनी वन विभागात विचारणा केली असतांना अश्या नावाचा कोणी अधिकारी नांदेड जिल्हा वन विभागात कार्यरत नाही असे सांगण्यात आले. तेव्हा दत्तात्रय काळे यांनी कपिल गणपत पाईकराव विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १७० आणि १७१ नुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.गुन्हा दाखल झाला आहे.बोगस,तोतया वन अधिकाऱ्यास अटक झाली आहे.

भारतीय दंड संहितेत कलम १७० नुसार आपण लोक सेवक नाहीत हे माहित असतांना ते पद धारण करून बनावट पणा करणाऱ्यास दोन वर्ष तुरुंगवास आणि रोख दंड विहित आहे. तसेच कलम १७१ नुसार लोकसेवकाचा गणवेश धारण करण्यासाठी ३ महिने कैद आणि रोख दंड विहित आहे.दोन्ही गुन्हे दखलपात्र आणि अजामीन पात्र आहेत.कोणतेही न्यायाधीश या कलमां अंतर्गतचा खटला चालवू शकतात.

बोगस तोतया पोलीस,बोगस वन परिक्षेत्र अधिकारी असे अनेक बनावट अधिकारी या जगात वावरत आहेत.जनतेला फसवत आहेत.आर्थिक लुबाडणूक करीत आहेत.जनतेने कधी खऱ्या अधिकारी आणि पोलिसांना त्याचे ओळखपत्र विचारलेच तर अगदी नवाच अनुभव येतो.म्हणूनच जनतेची फसवणूक होत असतेच.पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थनिक गुन्हा शाखेतील पोलिसांचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.