नांदेड(प्रतिनिधी)-रौप्य महोत्सवानंतर नगरसेवकांना अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिका नगरसेवकांना कश्मिर येथे घेवून जाणार आहे. याबाबत कांही पत्रकार बंधूंनी सर्वसामान्य जनतेचा पैसा सहलीसाठी खर्च होत आहे. यावर आसुड ओढत बातम्या लिहिल्या. याबाबत महानगरपालिका परिसरात बातमी लिहिणाऱ्याला कश्मिरला जायचे आहे म्हणून अशा बातम्या लिहिल्या अशी चर्चा सुरू झाली आहे.
नांदेड महानगरपालिकेचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा झाला. याबाबत परिस्थिती नुसार लाखो रुपये खर्च करून रौप्य महोत्सव साजरा केल्याप्रकरणी सुध्दा भरपूर बातम्या छापून आल्या. त्यानंतर नगरसेवकांना अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली काश्मिर येथे घेवून जाणार आहोत असा आदेश निघाला. या आदेशावर तयारी सुरू झाली. पैसा तर सर्वसामान्य नागरीकाचा खर्च होणार आहे यात कांही शंका नाही. पण त्यावर मजा करण्याचा अधिकार महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगरसेवकांना दिला. घडलेला प्रकार चुकीचा आहे अशा मतितार्थाने कांही पत्रकारांनी याबाबत आसुड ओढत बातम्या लिहिल्या. दुर्देवाची बाब अशी आहे की, या बातम्यांमुळे नगरपालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडले. सर्वसामान्य जनतेचा पैसा नगरसेवकांना अशा पध्दतीने सहलीवर खर्च करता येणार नाही. हे सत्यच आहे. परंतू आपल्याविरुध्द आलेल्या बातम्यांना प्रतिहल्ला करून वेगवेगळ्या पध्दतीने पत्रकारांना त्रास देण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत. ब्रिटीश पत्रकार जॉर्ज ऑर्वेल म्हणतात सत्ताधाऱ्यांना जे छापू नये असे वाटते, ते छापणे म्हणे म्हणजेच पत्रकारीता. अन्य सर्व केवळ जनसंपर्क. या शब्दानुसार सहलीची बातमी छापणे हे सत्ताधाऱ्यांना आवडणारे नाहीच. पण महानगरपालिकेत सुरू असलेली अशी चर्चा ही लिहिणाऱ्याला पत्रकाराला सुध्दा नगरसेवकांसोबत कश्मिरला जाण्याची इच्छा आहे म्हणूनच ती बातमी लिहिली आहे आमच्या दृष्टीकोणातून पत्रकारांनी असे लिहिणे त्यांचा हक्क आहे. पण महानगरपालिकेतील चर्चा खरी असेल, तेच सत्य असेल तर मग मात्र सआदत हसन मन्टो यांनी पत्रकारांची केलेली व्याख्या खरी आहे असेच म्हणावे लागेल.