

फसवणूकीचा 100 टक्के ऐवज जप्त ;पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांची कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रा तील मुलीसोबत लग्न लावून देतो असे सांगून मध्यप्रदेशातील एका कुटूंबियाची दीड लाख रुपये रोख आणि एक 12 हजार रुपयांचे मंगळसुत्र अशी फसवणूक करणाऱ्या चार महिला आणि एका पुरूषास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांनी काही तासातच जेरबंद करून त्यांच्याकडून फसवणूकीची 100 टक्के वसुली केल्याची जबरदस्त कामगिरी केली आहे. न्यायालयाने या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
उजैन मध्यप्रदेश येथील आत्माराम बळवंत मालवीय हे त्यांची पत्नी कृष्णा आणि मुलगा नेमीचंद असे नांदेडला आले. त्यांच्या एका ओळखीच्या माणसाची पत्नी परभणी येथील राहणारी आहे. ती तुमच्या मुलाचे लग्न करून देईल असे सांगितल्याने आत्माराम मालविय आणि त्यांचे कुटूंबिय एका कारमध्ये बसून 22 मे रोजी नांदेडला आले. त्यांनी ओळख आणलेल्या शेख आमिनाबी शेख नोशाद यांनी मालविय कुटूंबियांना विष्णुपूरी येथील काळेश्र्वर मंदिराच्या कमानीजवळ बोलावले. तेथे काळेश्र्वर मंदिरात तुमच्या मुलाचे लग्न लावून देवू यासाठी दीड लाख रुपये रोख आणि लग्न लावणाऱ्या नवरीसाठी एक मंगळसुत्र अशी मागणी मालविय कुटूंबियांकडे करण्यात आली. मालविय कुटूंबियांनी ती मागणी पुर्ण केली. विष्णुपूरी येथे एका हॉटेलमध्ये जेवण करून 22 मे च्या सायंकाळी 7 वाजता मालविय कुटूंबियांची मंडळी एक-एक करून गायब झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मालविय कुटूंबियांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख आमिनाबी शेख नौशाद, सुनिता चंद्रभान जगताप, सुनंदा रामभाऊ उकलकर, शिवाजी राजाभाऊ कोकाटे आणि आशा उत्तम खंगले चौघे रा.नांदेड यांना पकडले. मालविय कुटूंबियांकडून घेतलेले दीड लाख रुपये रोख आणि सोन्याचे मंगळसूत्र जप्त सुध्दा केले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे आहे.
पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार माधव स्वामी, शेख रब्बानी, सुनिल गटलेवाड आणि महिला पोलीस अंमलदार पुनम उदगिरे यांनी फसवणूक करणाऱ्या चार महिला आणि एक पुरूष यांना आज 23 मे रोजी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली. घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी चार महिला आणि एका पुरूषांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
आमच्याकडे मुलगी आहे. तुमच्या मुलाचे लग्न लावून देवू असे सांगणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. भारतातील कांही भागांमध्ये मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत कमी झाला आहे आणि त्यामुळे अशा आमिषांना मुलाचे आई-वडील बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. नांदेड जिल्हा पोलीसांनी सुध्दा अशा अनेक टोळ्यांना जेरबंद केलेले आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांचे उत्तम कागिरीसाठी कौतुक केले आहे.