

नांदेड,(प्रतिनिधी)- श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेडच्या (एसजीजीएस) कम्प्युटर सायन्स विभागातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या पराग पाटील या विद्यार्थ्याची मायक्रोसॉफ्ट या कंपनीत ५२ लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरीसाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बेंचमार्क तयार केला आहे. तसेच या संस्थेतील तृतीय वर्षात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये इंटर्नशिप व अमेझॉन या कंपनीत चार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाली आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत जागतिक स्तरावरच्या सर्व संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत आहेत. अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी दिली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा जास्त नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या आहेत व ४२५ विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी मिळाली आहे. सरासरी ४.५ लाख रुपयांचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले असून १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पाच लाखापेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती संस्थेचे डीन इंडस्ट्री लायझन व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. रवींद्र जोशी यांनी दिली आहे.
जागतिक नामांकित कंपन्या कॉग्निझंट, टीसीएस, पर्सिस्टंट, कॅपजेमिनी, विप्रो, राजा सॉफ्टवेअर लॅब, डसॉल्ट सिस्टम्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, सिमेंस, अदानी ग्रुप, इन्फोसिस, एल अँड टी टेक्नॉलॉजी, बॉश, इमर्सन, ॲक्सेंचर, जॉन्सन कंट्रोल, नेट क्रॅकर, वेल्सपन, इत्यादी बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत आहेत. विशेषतः सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचा कल आहे. आयआयटीच्या प्लेसमेंट मॉडेलचे अनुकरण करून प्लेसमेंट प्रक्रियेत संस्थेने अनेक बदल केले आहेत. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना एम्पलोयाबिलिटी कोर्सेस, विद्यार्थ्यांचा ट्रेनिंग प्लेसमेंट सेल, ऑटोमेशन प्लॅटफॉर्म, तसेच माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप, सोशल नेटवर्क मार्केटिंग, या अनेक बदलांमुळे प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना फायदे होत आहेत. या संस्थेचे माजी विद्यार्थी जगातील अनेक मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहेत आणि हे माजी विद्यार्थी आपल्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन संस्थेची परतफेड करत आहेत. त्यामुळे या संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील संस्थां सारख्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.