नांदेड(प्रतिनिधी)-कांही जणांनी एका भुखंडाची बोगस मालकी संदर्भाने कागदपत्रे बनवली आणि त्या कागदपत्रांच्या आधारावर तो भुखंड तिसऱ्याच्याच ताब्यात दिला. जागेच्या मुळ मालकाला ती जागा बांधकाम करण्यासाठी तयारी केली असता त्यांच्या लक्षात आले की, ही जागा तिसऱ्याच्याच नावावर आहे. त्यातील बोगसगिरी समजून घेवून जमीन मालकाने 99 लाख रुपये दिले आणि बोगस कागदपत्रांचा विषय संपवला. तरी पण भुमाफियांनी त्यांना त्रास देणे सुरूच ठेवले. मग आपल्या आणि आपल्या कुटूंबाच्या जीवित रक्षणासाठी अखेर पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणातील दोन भुमाफियांना नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बडवे यांनी त्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सर्वसामान्य माणसाचे या जगात काय घडू शकते. याचा कांही अंदाज कधीच येत नाही. अशाच प्रकारे सर्वसामान्य माणसांवर अव्याहत अन्याय पुर्वीही सुरू होता आणि आज भारताच्या स्वातंत्र्याला 73 वर्ष झाल्यावर सुध्दा तो सुरुच आहे. नांदेड शहरात एक मोठी जागा होती. त्या जागेचे मालकी दस्तऐवज कांही जणांनी एकाच्या नावावर केले आणि त्याने ती जमीन तिसऱ्याला विकली. मुळ जमीनी मालकांना याबाबत कांही माहितीच नाही. हा प्रकार सन 2018-19 मध्ये घडला. पुढे त्या मुळ जमीन मालकांनी या जागेवर बांधकाम करण्याचे ठरविले. त्यावेळेस ही जमीन दुसऱ्याच्याच नावावर करण्यात आली आहे आणि ताब्यात मात्र तिसऱ्याच्या देण्यात आली आहे ही माहिती मुळ मालकांना मिळाली. त्यावेळी त्यांनी मध्यस्थीप्रकाराने त्या जागेवर कब्जा मारलेल्या भुमाफीयांना 99 लाख रुपये दिले आणि नवीन बांधकाम सुरू केले. बांधकाम सुरू झाल्यावर सुध्दा भुमाफीया त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देणे आणि नवीन खंडणीची मागणी करणे असे प्रकार घडवू लागले. त्यानंतर मात्र त्रासलेल्या या कुटूंबाने पोलीस ठाण्याचे दार ठोठावले. पोलीसांनी सुध्दा अत्यंत तत्परपध्दतीने त्यांना प्रतिसाद दिला आणि नांदेडच्या एका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 181/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 447, 385, 386, 120(ब) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे , अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनात नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांच्याकडे देण्यात आला. याकामात इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अत्यंत जलदगतीने कार्यवाही करत 22 मेच्या रात्री 2 वाजता ओमसिंह दयालसिंह ठाकूर (47) रा.जुना मोंढा नांदेड आणि रविंद्रसिंघ लक्ष्मणसिंघ जंगी (49) रा.अबचलनगर यांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी या दोघांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी देण्याची विनंती केली असतांना न्यायाधीश बडवे यांनी दोन दिवस या दोन भुमाफियांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या घटनेसारख्या घटनांच्या माध्यमातून भुमाफिया सर्वसामान्य माणसाला गुन्हेगारी पध्दतीने वेठीला धरतात. आणि त्यांच्याकडून मोठा आर्थिक फायदा खंडणीच्या रुपात घेतात. या घटनेसारख्या कांही घटनांमध्ये जनतेची फसवणूक झाली असेल, त्यांच्याकडून खंडणी मागितली असेल, खंडणी घेतली असेल अशा परिस्थितीत जनतेने पोलीसांशी संपर्क साधावा कारण सर्वसामान्य जनतेच्या जिवीत व वित्त रक्षणाची जबाबदारी घेवूनच आम्ही ही नोकरी पत्कारलेली आहे.
