नांदेड(प्रतिनिधी)-22 मेच्या मध्यरात्री 11.30 ते 12.30 या वेळेदरम्यान धनेगाव येथे घराबाहेर झोपलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड टाकून त्याचा खून करण्यात आला आहे.
आशिष भागवत गायकवाड हे तिरुपती सोसायटी धनेगाव येथे राहतात. ते ट्रकची बॉडी बनविण्याच्या कामात वेल्टींगचे काम करतात. त्यांचे मुळगाव सोमठाणा ता.नायगाव हे आहे. त्यांचे वडील मागील 25 वर्षापुर्वी मुळ गाव सोडून नांदेडला आले. स्वत:चा भुखंड घेवून त्यावर घर बांधले आणि आम्ही सर्व कुटूंबिय तेथे राहतो. वडील भागवत शिवराम गायकवाड हे वाजेगाव येथे जमील शेठ यांच्या सॉ मिलवर काम करतात.
दि.21 मे रोजी रात्री सर्व कुटूंबिय जेवल्यानंतर वडील भागवत गायकवाड हे आपल्या घरातील बांधकामासाठी वाळू चाळत होते. रात्री 11 वाजता लाईट गेली. नंतर 12.30 वाजता बहिणीचा रडण्याचा आवाज आला आणि मी पाहिले तेंव्हा वडील शिवराम गायकवाड हे घराच्या दरवाज्याच्या उंबऱ्यावर डोके टेकून होते आणि त्यांचे डोके फुटलेले होते. त्यांचे डोके ज्या दगडाने फोडले तो दगड तेथेच शेजारी पडलेला होता. मी आणि माझ्या शेजाऱ्यांनी वडीलांना त्वरीत प्रभावाने दवाखान्यात नेले त्यांनी सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयाकडे जातांना रस्त्यातील एका खाजगी रुग्णालयात आम्ही वडीलांची तपासणी करण्यासाठी नेले असतांना तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे सांगितले. मुळात वडील लाईट नसल्यामुळे घराबाहेरच्या उंबऱ्याला टेकून पहुडले होते. त्यांच्या डोक्यावर दगड टाकून कोणी तरी अज्ञात माणसाने अज्ञात कारणासाठी खून केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याने हा खूनाचा गुन्हा दाखल केला असून श्रीमान अशोकरावजी घोरबांड साहेबांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास सुरु झाला आहे.
