लेख

धन्यवाद वाचकांचे ….वास्तव न्युज लाईव्हला 365 दिवसात 6 लाख 97 हजार 466 वाचकांची पसंती

वास्तव न्युज लाईव्ह सुरू करून आज एक वर्ष अर्थात 365 दिवस पुर्ण झाले. या 365 दिवसांमध्ये 6 लाख 97 हजार 466 वाचकांनी वास्तव न्युज लाईव्हला भेट दिली. याची दररोजची सरासरी 1910 अशी आहे. या एक वर्षाच्या कालखंडात आता आमच्यावर कोणाचा दबाव नाही याचा आनंद सर्वात जास्त झाला. नाही तर यापुर्वीच्या असंख्य वर्षांमध्ये मेहनत करून लिहावे आणि ते छापले जायचे नाही याचा अनुभव घेतांना दगडासारखे असणारे हृदय मेणासारखे होवू लागले होते. त्यावर वाचकांच्या प्रतिसादाने ते हृदयी दगड आज पुन्हा मोठ्या उत्साहाने भविष्यातील कामासाठी तयार झाले आहे.
वर्तमान पत्र काय असते याची जाणिव 1976 ला एसएससीची परिक्षा पास केल्यानंतर लक्षात आले. त्यानंतर पुढे पदवी शिक्षण आणि नंतर दररोजचे काम करतांना आम्ही मार्गक्रमण करायला सुरूवात केली. 1984 मध्ये लग्न झाले. त्या काळात कुठे दहा रुपये उपब्ध झाले, वडीलांनी-आईने 50 दिले तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. अशा परिस्थितीतून पुढे जातांना पैशाची चणचण तेंव्हा पासून आजपर्यंत सुध्दा लागलेलीच आहे. पण सत्य या मार्गावर चालण्याचे शिक्षण आदरनिय वडीलांनी दिले होते आणि त्याची कास मात्र आजही सोडली नाही. त्या सत्याच्या मार्गावर चालतांना आपले अनेक परके झाले. पण त्यात आनंदाची बाब अशी आहे की, त्या सत्याच्या मार्गाची छाननी केल्यानंतर बरेच परके सुध्दा आमचे झाले. मराठी मातीत जन्म घेतल्यानंतर मराठी ही मायबोली ही किती श्रीमंत आहे याची जाणिव हळूहळू पुढे आली. ज्या घटनांना आम्ही शब्दातून बोलू शकत नाही त्यांना अक्षरातून व्यक्त करण्याची कला अवगत झाली आणि ती कला आम्ही पुढे नेतांना त्या कलेच्या अस्मितेला कधीच धोका दिला नाही.
दरम्यानच्या काळात वर्तमानपत्र आणि त्यात येणाऱ्या बातम्या वाचून असे वाटू लागले की, घडले काही आहे आणि लिहिले कांही वेगळेच जात आहे. त्यावर मात करण्यासाठी कोरा कागद घेवून आपल्या अक्षरांना शब्दात बदलत त्याची वाक्ये तयार केली. या घटनाक्रमात कांही जणांनी आमची खिल्ली उडवली, कांही जणांनी त्याला प्रतिसाद देत लगे रहो असे सांगितले. हे सर्व करत असतांना आमच्या लहानपणापासून युवा होईपर्यंतच्या कालखंडात जमलेले मित्र मंडळी एवढे होते की, इतरांपेक्षा ते जास्त होते आणि त्यामुळे त्यांनी घडलेल्या घटनेला सांगितल्यानंतर आम्ही त्या घटनांना बातम्यांचे स्वरुप दिले. त्यावेळी आम्ही घेतलेली मेहनत आमच्या रंगांमध्ये भर पाडत गेली आणि त्या रंगांचे आम्ही इंद्रधनुष्य बनवले. ते इंद्रधनुष्य आजही आम्हाला आनंदच देतो.
वर्तमानपत्रांमध्ये काम करणाऱ्या कांही “सुणिया’ नी आमचा उपयोग सेवक म्हणून केला. आम्ही त्या सुणियांना दिलेल्या सेवांचा उल्लेख करत लिहु लागलो तर वर्तमानपत्रांची 8 पाने भरतील. पण एक किस्सा आम्ही नक्कीच लिहु इच्छीतो की, आमचा उपयोग करणाऱ्या दोन सुणियांमधील एकाला आम्ही तीन वर्षात घटस्फोट दिला आणि दुसऱ्याला तब्बल 12 वर्षांनी मग यातील खरा सुणिया कोणता हे वाचकांनी ठरवायचे आहे. आम्ही सुणियांना ओळखले तेंव्हा त्यांना दुर ढकलले. आजही ते दोन्ही सुणिये या जगात जीवंत आहेत. पण आम्हाला त्यांच्यासमोरून चालतांना ताठ मानेने चालता येते याचाच आनंद आम्ही शब्दात लिहु शकणार नाही. आपल्या जीवनात वडीलांकडून मिळालेल्या शिकवणीला आम्ही सत्यात उतरवले. त्यांनी सांगितले होते की, तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्हाला स्वत: बदल काय वाटते हे जास्त महत्वपुर्ण आहे. अ अक्षराची वळण चुकल्यानंतर वडील ज्या वेळी कानसुळीत आवाज काढायचे तो आवाज आजही आमच्या कानात गुंजतोय.त्यांनी शिकवले होते. की, नुकसान हो अथवा फायदा कधीच काही लपवायचे नाही. कांही लपवलेच तर मला ते कधी तरी कळणारच आहे. त्यावेळी तुमची अवस्था काय होईल याचा विचार करा.वडीलांच्या या शिकवणीला आम्ही स्वत:च्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकासोबत भागिदार बनवले. ज्यांनी या शिकवणीची भागिदारी घेतली ते तर आनंदी आहेतच आणि त्यांना पाहुन आम्हालाही आनंद होतो. आम्ही शिकवलेले अनेक जण आमच्यापेक्षा मोठे झाले. आम्हाला कधीच त्याचे दु:ख वाटले नाही. भविष्यात, आमच्या मृत्यूपर्यंत सुध्दा त्याची आम्हाला कधीच खंत राहणार नाही. त्यांनी आपल्या बुध्दीने दिलेल्या शिकवणीप्रमाणे आमच्यासोबत वागले आम्ही मात्र कोणाचेच वाईट केले नाही. आमच्यासोबत जीवनात भागिदार बनलेल्या अनेक सुणियांनी आम्ही हाकालल्यानंतर आमच्या लेकरांशी संपर्क साधून आम्ही तर चांगलेच आहोत असेच दाखवायचा केलेला खोटा प्रयत्न हाणून पाडला गेला. आम्ही त्यात कांहीच केले नाही आपोआपाच त्यांचे पितळ उघडे पडले आणि त्यांना तोंड लपवून फिरावे लागले. कांही सुणियांनी आमचा उपयोग पत्रकार म्हणून तर केलाच सोबतच आमचा उपयोग चार चाकी गाडीचा चालक म्हणून पण केला. गाडी चालवतांना फोनवर सुध्दा आम्ही बातम्या तयार केल्या. अशी आमच्या पत्रकारीतेच्या कामासोबत आम्ही इमान राखली.
स्वत:ला या जगाचा रक्षणकर्ता समजणाऱ्या आणि जगात मीच राजा हरीशचंद्र आहे अशी समज असणाऱ्या कांही भडव्यांनी आमच्याविरुध्द न्यायालयात अबु्र नुकसानीचे दावे दाखल केले. ते आजही प्रलंबित आहेत. त्यांना आम्ही सामोरे जात आहोत. आणि त्यात विजय आमचाच होणार आहे असा आमचा आमच्या हरीवर विश्र्वास आहे. आम्ही जे कांही लिहिलेले ते सत्यच आहे. पण त्यात कांही सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी त्या भडव्यांना आमच्याविरुध्द उचकावून लावले. आणि त्यांना पाठराखण दिली त्यामुळे हे दावे न्यायालयात आले. असो आमचे चुक असेल तर न्यायालय आमचा हिशोब करेल कारण या भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा मान कायदाला आहे आणि आम्ही त्या कायद्यापेक्षा मोठे नाहीत असा आमचा स्वत:चा समज आहे.
वर्तमान पत्रात काम करतांना ईलेक्ट्रॉनिक मिडीयाची एक बहार आली. आम्हाला अनेकांनी अशी हुल दिली की, तुम्ही आलात तर आमची पण प्रगती गतीमान होईल. इतरांच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याची वृत्ती लहानपणापासूनच बाळगली होती. त्यामुळे आम्ही वर्तमानपत्र सोडून ईलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या कांही लोकांसोबत काम करण्यास सुरूवात केली. त्यात सुध्दा दगडाचे काटे आमच्या मार्गामध्ये टाकण्यात आले पण आम्ही त्याला न घाबरता आमचे मार्गक्रमण सुरू ठेवले. त्यानंतर पोर्टलचा विषय आला. त्यातही काम करतांना आम्ही केलेल्या मेहनतीतून अनेकांनी चवदार फळे मिळवली. त्यातही आम्हाला कधी दु:ख वाटले नाही. पण आम्ही केलेल्या मेहनतीनंतर तयार केलेल्या बातम्या त्यांनी छापायच्या नाहीत हे पाहिले तेंव्हा मात्र आम्हालाही कळाले की, माणुस निवडण्यामध्ये आमची चुक झाली आहे. असो जग आहे, व्यक्ती आहेत, प्रकृती आहेत आणि त्याचे परिणाम आहेत ते सर्व आम्ही सांभाळत 20 मे 2021 रोजी वास्तव न्युज लाईव्हची स्थापना केली.
वास्तव न्युज लाईव्हवर काम करतांना आम्हाला एक बाब लक्षात आली की आता आमचा मालक कोणी नाही. पुर्वी सुध्दा सत्याशिवाय बातमीच लिहिली नव्हती. ती छापून येत नव्हती, कांही हरामखोरांनी आमच्या पोर्टल मालकांना पटवून आमच्या बातम्यांना खो दिला अशा अनंत घटनांना सहन केल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हमध्ये आम्हाला काही बंधन नाही, कोणी मालक नाही, आम्ही करू, आनंद येईल किंवा त्रास होईल या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून वास्तव न्युज लाईव्हमधील काम गेली 365 दिवस सुरू आहे. या 365 दिवसांमध्ये 6 लाख 97 हजार 466 वाचकांनी वास्तव न्युज लाईव्ह या संकेतस्थळाला भेट देवून आम्ही केलेल्या कर्तबावर शिक्कामोर्तब केला. वाचकांनी प्रतिसाद दिला नसता तर हा आमचा अपघात ठरला असता त्यामुळे आम्ही वाचकांचे ऋण न फेडताच हे काम अव्याहतपणे, सत्य विचाराने, कोणालाही न घाबरता करणार आहोत याची ग्वाही आम्ही आमच्या वाचकांना वास्तव न्युज लाईव्हच्या पहिल्या वर्षपुर्ती दिनी देत आहोत.

-रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *