नांदेड,(प्रतिनिधी)- बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाट क्रमांक २ वर कार्यवाही करून सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केलेली कार्यवाही महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दोन पानांच्या एक आदेशात पूर्ण पणे धुवून काढली.पण अर्चित चांडक यांनी आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे आपल्या कर्तव्याची पूजा करून सुरु केलेले कार्य अखंडित सुरूच ठेवावे. कायद्याच्या पळवाटांचा उपयोग सरकारी अधिकारीच आपल्या मर्जीतील लोकांना शिकवतात बुद्धिबळातील खेळा प्रमाणे आज आपला बेकायदेशीर लोकांवर चाल करणारा राजा मागे असला तरीही चेक मेट आपणच करायचा आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली उप विभागीय कार्यालयाचे उप विभागीय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी १५ मे रोजी सगरोळी रेती घाट क्रमांक २ वर रात्री २ वाजता कार्यवाही करून तेथील ५ जेसीबी आणि ३८ ट्रक आणि टिप्पर जप्त करून त्या बाबतचा अहवाल बिलोली पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी अत्यंत काटेकोर काम करणारे तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याकडे पाठवला. तो अहवाल पकडलेले ३८ ट्रक आणि टिप्पर तसेच ५ जेसीबी सोडून देणे योग्य होईल असा महत्वपूर्ण अहवाल अत्यंत कर्तव्यदक्ष उप विभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्याकडे १७ मे २०२२ रोजी पाठवला.१५ मे रविवार आणि १६ मे भगवान गौतम बुद्ध जन्म सोहळा यासाठी सुट्टी होती.सगरोळी रेती घाट क्रमांक २ हा शेख अलीम अमीरसाब रा.अटकळी ता.बिलोली या महान कंत्राटदारांना सुटलेला आहे.
यावर अत्यंत विद्युत गतीने सुनावणी घेण्याची आपली जबाबदारी सचिन गिरी यांनी पार पाडली आणि १८ मे २०२२ रोजी सायंकाळ होण्या अगोदर आदेश केला.त्या आदेशात ३८ ट्रक आणि ४ जेसीबी सोडून देण्याचे आदेश पारित करून आपले अत्यंत महत्वपूर्ण कार्य पूर्ण केले.पोलिसांनी ५ जेसीबी पकडलेले होते.मग ५ व्या जेसीबीच्या काय झाले या बाबत सचिन गिरी यांनी आपल्या आदेशात काही एक लिहिलेले नाही.वाळू कंत्राटदार शेख अलीम यांनी दिलेल्या एका पत्राचा उल्लेख या आदेशात आहे.त्यात ते पत्र १३ मे २०२२ रोजीचे आहे असे लिहिलेले आहे.सोडलेल्या ट्रक मध्ये एक ट्रक बिना नोंदणी नंबरचा आहे.तो पण सोडून देण्यात आला आहे.पोलिसांनी महसूल कायदा अर्थात गौण खनिज कायदा यातील सूर्यास्त ते सुर्योदय वाळू उत्खनन आणि वाहतूक करता येत नाही असे आपल्या अहवालात लिहलेले आहे.पण १३ मे चे शेख अलीम यांचे पत्र सचिन गिरी यांना जास्त ‘वजनदार’ वाटले.त्यात जेसीबी अडकलेले ट्रक बाहेर काढण्यासाठी आणले होते असे त्या खुलाश्यात शेख अलीम यांनी मांडलेला युक्तिवाद जास्त जोरदार होता,असे या आदेशात लिहिल्या प्रमाणे दिसते.सोबतच वजनाचा एक दगड या आदेशात पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या डोक्यावर सुद्धा ठेवण्यात आला आहे. त्यात पोलीस पंचनाम्यात सर्व वाहने वाळू घाटावरच उभी होती असे लिहिलेले आहे असा उल्लेख सचिन गिरी यांनी आपल्या अत्यंत महत्वपूर्ण निकालात केलेला आहे.एकूणच अत्यंत कायदेशीर वागणूक असणाऱ्या महसूल विभागाचे प्रमुख जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या अखत्यारीत कार्य करतांना काही चूक होणे अशक्यच आहे. असा झाला हा ‘लँड मार्क’ निकाल.
या बाबत काही जेसीबी मालकांशी संपर्क साधून आपले ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितले की,सगरोळी रेती घाट सापडलेले जेसीबी चिखलात फसलेले ट्रक बाहेर काढूच शकत नाहीत.तसेच त्या ठिकाणी रेती घाट असल्याने चिखल होणे म्हणजे उंटावरच्या गप्पा आहेत असे तो व्यक्ती म्हणाला. ते जेसीबी चैन चे आहेत.त्या जेसीबी कडून फक्त वाळू उपसा,मुरूम उपसा होण्यासाठीच ते बनवलेले आहेत. ट्रक फसले असेल हे सत्य मानले तर एक जेसीबी ठीक होता ५ जेसीबींचे काय काम ? असो महसूल खाते ‘सैल’ हा वाक प्रचार रूढ आहेच. पण त्या महसूल खात्याने पोलीस खाते करील तेच होईल हा वाक प्रचार खोटा ठरवल्याचे आज तरी दिसत आहे. पण महसूल विभागाने केलेली अत्यंत द्रुत सुनावणी आणि त्याचा जलदगती आदेश प्रशंसनीय नक्कीच आहे.
अर्चितजी आपल्या नावाच्या अर्था प्रमाणे आपण आपल्या कर्तव्याची पूजा सुरु केली आहे.भरपूर वेळ आहे आपल्याकडे आपले बेकायदेशीर लोकांवर कार्यवाही करण्याचे कार्य सुरूच ठेवा.त्यात कोणताही विचार करू नका. भगवान श्रीकृष्ण एकदा रणांगणातून पळून गेले होते त्यामुळे त्यांचे नाव ‘रणछोडदास’ असे झाले होते. पण पुन्हा ते रणांगणात आले तेव्हा मात्र त्यांनी शत्रूचा (आपल्या साठी बेकायदेशीर लोकांचा) संपूर्ण नायनाट केला होता. असो चालत राहते कभी वो आगे तो कभी हम आगे. आपण भारतीय पोलीस सेवेतील परीक्षा उत्तीर्ण करून आला आहात. कधी हत्ती करू शकत नाही ते काम मुंगी मोठ्या जोमात करते.याची तयारी करा.आपल्याला मार्गदर्शक पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे आहेत.त्यांच्याकडून जाणून घ्या.नांदेड जिल्ह्यात अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार असे आहेत की मुंगी प्रमाणे कार्य कसे करावे यात ते तरबेज आहेत.त्यांना आदेश द्या,बोलवा आणि आपले मनोवृत्ती कायम बेकायदा कृत्यांना नेस्तनाबूत करण्यात मग्न रहा.महसूल विभागातील पळवाटा शोधण्यासाठी तर आपणास घरीच सुविधा उपलब्ध आहेत.त्यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही लवकरच करा. कबड्डीच्या खेळात आपले पाय ओढण्यात चढाओढ लागलेली असते. त्यातून आपल्याला ‘सुपर रेड’करायची आहे यासाठी शुभकामना.