नांदेड(प्रतिनिधी)-15 मे रोजी 4 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि स्कुटी बळजबरी चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी 5 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.16 मे रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 286/2022 ची तक्रार सय्यद अतिक सय्यद रशिद यांनी दिली. त्यांच्यानुसार 15 मेच्या रात्री 10 वाजेच्यासुमारास ते आपली स्कुटी क्रमांक एम.एच.26 सी.ए.5498 वर बसून आठवडी बाजारातील पैसे त्या दुचाकीच्या डीकीमध्ये ठेवून घराकडे जात असतांना वाजेगाव जवळ तीन लोकांनी त्यांच्या अंगावर मिर्चीची पुड टाकून, तलवारीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावले आणि पैसे असलेली स्कुटी घेवून पळाले.
या प्रकरणी नांदेड ग्रामीणचे अत्यंत कर्तव्यदक्ष, गुन्हेगारांचे कर्दनकाळ, अत्यंत उत्कृष्ट आणि मागील एक वर्षापासून जास्त काळ तोंडी आदेशावर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार सुनिल गटलेवाड, माधव स्वामी यांनी या दरोडा प्रकरणातील सोहेब खान शब्बीर खान (19), नुर खान हुसेन खान पठाण (35),सय्यद ताहेर सय्यद अब्दुल (34) या तिघांना अटक करून आज 19 मे रोजी न्यायालयात हजर केले.
न्यायालयासमक्ष पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार या प्रकरणात शेख फेरोज शेख इसाक आणि हरीश उर्फ आर्या देविदास शर्मा या दोघांना पकडायचे आहे. सोबतच बळजबरी चोरलेले 4 लाख 60 हजार रुपये आणि 70 हजार रुपये किंमतीची स्कुटी जप्त करायची आहे. यासाठी पकडलेलया तिघांना पोलीस कोठडी द्यावी. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एम.बी.कुलकर्णी यांनी पाच पैकी पकडलेल्या तीन दरोडेखोरांना 5 दिवस अर्थात 24 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.