नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटीत केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे.ङ्गऔरंगाबाद विभागासाठी समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दिनांक 22 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या नागरीकांना / संस्थाना मा. समर्पित आयोगाची भेट घ्यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे अशा नागरीकांनी/संस्थांनी त्यांचे/संस्थेचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल इत्यादी माहितीसह नोंदविणे आवश्यक आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील नागरीकांसाठी अहवान करण्यात येते की, ज्या नागरीकांना / संस्थाना मा. समर्पित आयोगाची भेट घ्यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे अशा इच्छुक नागरीकांनी/संस्थांनी त्यांचे/संस्थेचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल इत्यादी माहिती नगरपरिषद प्रशासन विभाग, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे, दिनांक 21 मे 2022 पर्यंत कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत) नोंदणी करण्यात यावी असे प्रसिध्द पत्रक मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी प्रसिध्दीसाठी पाठवले आहे.