नांदेड(प्रतिनिधी)-नारायण राणेंचे बोलणे आमच्यासाठी मनोरंजन आहे आणि आम्ही त्याला मनोरंजन म्हणूनच ऐकतो आणि वाचतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख खा.शरदचंद्र पवार यांनी दिली.
आज नांदेड शहरातील विविध कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रमुख खा.शरदचंद्र पवार आले होते. दुपारी ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंढे, संसदीय कार्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री फौजीया खान, नांदेडचे अध्यक्ष हरीहरराव भोसीकर, माजी आ.शंकरअण्णा धोंडगे आणि सुनिल कदम यांची उपस्थिती होती.
नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे सरकार फक्त 6 जूनपर्यंत आहे. या प्रश्नावर उत्तर देतांना खा.पवार यांनी ते आमच्यासाठी मनोरंजन आहे आणि ते आम्ही मनोरंजन म्हणूनच घेतो आणि वाचतो सुध्दा असे सांगितले. महाराष्ट्राच्या भुमित एमआयएम प्रमुख असदोद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरोद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या थडग्यावर पुष्पचक्र वाहुन केलेल्या कृतीचा पवार यांनी निषेध केला. महाराष्ट्राच्या ईतिहासात काय घडले आहे हे पाहता ही घटना चुकीची असल्याचे ते म्हणाले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बोलतांना शरदचंद्र पवार म्हणाले राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. सर्व पक्ष मिळून त्याबद्दल सर्वांकश निर्णय घेतील आणि त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काम करतील. किंमतीवर नियंत्रण ठेवणे हे केंद्र सरकारचे काम आहे आणि ते नियंत्रण अयोग्य असले तर त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अनेक जागी होता आणि केंद्र सरकारचे त्यावर निर्णय नाही यासंदर्भाने खंत व्यक्त केली. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळत नाही असेही शरदचंद्र पवार यांनी सांगितले. जात आणि धर्म या संबंधांचा आधार घेवून सार्वजनिक कार्यक्रमात तो आणणे ही बाब अत्यंत चुकीची असल्याचे पवार म्हणाले. मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्यावर झालेल्या अटकेच्या कार्यवाहीबद्दल बोलातांना यंत्रणेने अत्यंत चुकीच्या पध्दतीने हे काम केले आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकारला काय दाखवायचे आहे हेच कळत नाही. एका पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून अनिल देशमुख यांच्याविरुध्द केलेली कार्यवाही चुकीची असल्याचे पवार म्हणाले.
