नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय देण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात आज विविध कार्यक्रमांसाठी दिलीप वळसे पाटील आले होते. त्यात त्यांनी नांदेड-परभणी-हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांतील पोलीसांची आढावा बैठक पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्यासह घेतली. त्या अगोदर ते बांधकाम व्यावसायीक संजय बियाणी यांच्या घरी भेट दिली. बियाणी यांच्या पत्नीने सांगितलेली सर्व हकीकत मी पुर्णपणे समजून घेतली आहे. तेथे झालेली चर्चा ही खाजगी स्वरुपाची आहे त्यामुळे मला ती जाहीर करता येणार नाही.
नांदेड जिल्ह्यात एकूण 36 पोलीस ठाणे आहेत. त्यामुळे एका पोलीस अधिक्षकाला एवढा मोठा भार सांभाळून काम करणे अवघड आहे. राज्य शासनाकडे नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय देण्याचा प्रस्ताव आलेला आहे. त्यावर लवकरात लवकर तो विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवून जिल्ह्यात, नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय आणि नांदेड ग्रामीण पोलीस अधिक्षक असे दोन भाग करण्यात येतील ज्यामुळे जिल्ह्याचा पोलीस दलातील कारभार योग्यरितीने सुरू राहील.
बियाणी हत्या प्रकरणाचा तपास दुसऱ्या यंत्रणेकडे देण्याच्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास लावण्यात सक्षम आहेत. त्यामुळे दुसऱ्या तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास वळविण्याचा प्रश्न उदभवत नाही. नांदेड जिल्हा पोलीस दलाने आजपर्यंत बियाणी हत्याकांड संदर्भाने घेतलेल्या मेहनतीची मी बारकाईने समिक्षा केली असून ते योग्य दिशेने जात आहेत असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
