नांदेड(प्रतिनिधी)- रेल्वेची नोकरी लावतो म्हणून कांही जणांनी एकाची 9 लाख 70 हजारांना फसवणूक केली आहे. उस्माननग पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांत प्रभु गुडमलवार या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार 7 फेबु्रवारी 2017 ते 16 जून 2021 दरम्यान चार जणांनी मिळून रेल्वेत टी.सी.ची नोकरी लावून देतो असे आमिश त्याला दाखवले आणि त्याची सर्व मुळकागदपत्रे स्वत:जवळ घेतली. बनावट दस्तअवेज तयार करून त्याला बोगस नियुक्तीपत्र दिले. या सर्व कामासाठी त्या चार जणांना प्रशांत गुडमलवारकडून 9 लाख 70 हजार रुपये घेतले होते. आपली फसवणूक झाली. असे कळल्यानंतर प्रशांत गुडमलवारने याबाबत उस्माननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उस्माननगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467,468, 34 नुसार गुन्हा क्रमांक 88/2022 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकत्ते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पल्लेवाड अधिक तपास करीत आहेत.
