नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हारी आणि कोसमेट या दोन गावात चोऱ्या झाल्या असून 80 हजारांचा ऐवज लंपास झाला. बारेगाव ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. लिंबगाव, देगलूर, किनवट आणि उमरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपये किंमतीच्या चार दुचाक्या गाड्या गेल्या आहेत.
कोल्हारी ता.किनवट येथील गंगाधर कोंडीबा गडपाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 मे रोजी मध्यरात्री त्यांच्या घराचे कवाड उचलून हुकातून बाहेर काढले आणि आत प्रवेश करून घरातील पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेले 40 हजार रुपये रोख रक्कम आणि 5 हजार रुपये चांदीचे कडे चोरून नेले आहे. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक तोटेवाड अधिक तपास करीत आहेत.
मौजे कोसमेट ता.किनवट येथील विशाल मारोती बोडेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 मेच्या 12.30 वाजता घरात झोपलेल्या आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र 1 तोळ्याचे किंमत 35 हजार रुपयांचे कोणी तरी कापून नेले आहे. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. एएसआय तोटेवाड अधिक तपास करीत आहेत.
बोरगाव ता.लोहा येथील आबाजी खुशबराव सुरनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 मेच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले 73 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार किरपणे अधिक तपास करीत आहेत.
लिंबगाव, देगलूर, किनवट आणि उमरी या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. या संदर्भाने चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
