नांदेड(प्रतिनिधी) -26 एप्रिल रोजी सरकारी दवाखान्यात एका महिलेला खऱ्या 8 लाख रुपयांच्या मोबदल्यात 30 लाख रुपये बनावट पध्दतीने देवून फसवणूक करणाऱ्या दोन अज्ञात ठकसेनांना नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांनी पकडून आणले. त्यांच्याकडून 5 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किंमतीची दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आज त्या दोन ठकसेनांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
दि.26 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यातील सुनंदा महेंद्र रामटेके या 50 वर्षीय महिलेने तक्रार दिली की, तिच्यासोबत सामाजिक संकेतस्थळावर संपर्क साधून कोणी अशोक पाटील नावाच्या व्यक्तीने त्यांना तुमच्या संस्थांसाठी अनुदान मिळवून देतो अशी हुल देवून त्यांच्याकडून 8 लाख रुपये घेतले आणि त्यांना 30 लाख रुपयांचे एक बंडल दाखवले त्यामध्ये बरच्या भागात 400 रुपये दरांच्या 4 नोटा होत्या आणि इतर सर्व बंडल सेलो टेपने बंद करण्यात आले होते. या फसवणूकीसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या 254/2022 चा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांच्याकडे देण्यात आला. त्यांना पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील आणि पोलीस अंमलदार सुनिल गटलेवार यांनी मदत केली.
सुनंदा टामटेके यांना फसवल्याची घटना शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे घडली होती. महेश कोरे यांनी रुग्णालय ते वजिराबाद पर्यंतचे अनेक सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी केरबा यादव काकडे (34) रा. उदगीर आणि अविनाश अशोक सुर्यवंशी (31) रा.उदगीर या दोघांना पकडले. न्यायालयाने या दोघांना दोनदा पोलीस कोठडी मंजुरी केली. या पोलीस कोठडीदरम्यान 5 लाख रुपये रोख रक्कम आणि 1 लाख रुपये किंमतीची स्कुटी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज न्यायालयाने त्या दोन ठकसेनांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. अज्ञात माणसाने एका महिलेची 8 लाखांची केलेली फसवणूक उघडकीस आणणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, विजय पाटील, पोलीस अंमलदार सुनिल गटलेवार यांचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.
