नांदेड(प्रतिनिधी)-दत्तनगर भागातील एका फायनान्स कार्यालयात बेकायदेशीर शस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी तेथे छापा टाकून दहा धारदार शस्त्रे पकडली आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, विश्र्वदिप रोडे, पोलीस अंमदार शेख इब्राहिम, देवसिंग सिंगल, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, दशरथ पाटील आणि दत्ता वडजे यांना दत्तनगर भागातील दशमेश फायनान्स कार्यालय तपासण्यासाठी पाठविले. त्या ठिकाणी पोलीसांनी 10 धारधार शस्त्रे पकडली. या शस्त्रांची किंमत 35 हजार रुपये दाखविण्यात आली आहे. त्या ठिकाणी सुनिलसिंग भगतसिंग आडे या व्यक्तीला पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी धारदार शस्त्रे पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.
