नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणराजनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 98 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. टाऊनमार्केट सोसायटी हिंगोली गेट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. अर्धापूर येथे पेट्रोलपंपावर झोपलेल्या लोकांना पाहुन काऊंटरच चोरट्यांनी उचलून नेले आहेत. त्यात 45 हजार रुपये होते. नवा मोंढा भागात झालेल्या सत्संग समारोहात चोरट्यांनी एका महिलेची 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्टेडीयम जवळून एक 40 हजार रुपयांची दुचाकी चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकारामध्ये 5 लाख 95 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
गणराजनगरमध्ये राहणारे कानाराम अमृतराव चौरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 5 मे रोजी घराला कुलूप लावून दुकानाकडे गेले असतांना दुपारी 1 वाजता घरी आले तेंव्हा घराला लावलेले कुलूप तोडलेले होते. कपाटात ठेवलेली 3 लाख 98 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे अधिक तपास करीत आहेत.
अण्णाभाऊ साठे चौकाजवळ असलेल्या टाऊनमार्केट सोसायटीमधील सुमित सुधाकरराव गुंडावार यांचे घर चोरट्यांनी 6 मे रोजी दुपारी फोडले ते आणि त्यांचे कुटूंबिय शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 14 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
खडकुत पाटीजवळी पिंपळगाव शिवारातील गॅस पंप व्यवस्थापक त्र्यंबक मुरलीधरराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 मे रोजी रात्री 3 ते 3.20 या वेळेदरम्यान पंपावरील कर्मचारी जमा झालेली 45 हजार रुपये रक्कम काऊंटरमध्ये ठेवून झोपण्यासाठी गेले. चोरट्यांनी त्या खिडकीचे काच काढून खिडकी आत ढकलून प्रवेश केला आणि पैसे ठेवलेले काऊंटरच उचलून नेले. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार खरबे अधिक तपास करीत आहेत.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवा मोंढा मैदानावर 5 मे रोजी संत निरंकारी माता यांचे प्रवचन होते. रात्री 9.30 वाजता हे प्रवचन संपल्यानंतर गंगावती रामलू मोटाला (60) या महिला पाणी पिण्यासाठी गेल्या असतांना गर्दीचा फायदा उचलून त्यांच्या गळ्यातील 22 ग्रॅम सोन्याची चैन किंमत 60 हजार रुपये किंमतीची कोणी तरी चोरली. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
स्टेडीयम जवळ बाबाराव शंकरराव फुलारी यांनी आपली दुचाकी गाडी 3 मे रोजी रात्री उभी केली होती. या गाडीचा क्रमांक एम.एच.26 बी.एन.3490 असा आहे. गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. रात्री 11 वाजता ही गाडी चोरीला गेली. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
