नांदेड(प्रतिनिधी)-दि.4 मे च्यायारात्री लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गोळीबार घडला आहे. हा गोळीबार पोलीसांनी आरोपीवर करून त्यास पकडले आहे. पोलीस उपनिरिक्षकाची बंदुक हिसकावून त्यांनाच मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांच्या डाव्या पायाच्या पिंडरीत गोळी मारून त्यास पकडले आहे.
दि.30 एप्रिल रोजी जवाहरनगर शिवारात दिलीप पुंडलिकराव डाखोरे (25) या युवकाने पिंटू कसबे नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला होता. सुदैवाने त्याचा नेम चुकला त्यानंतर दिलीप डाखोरेने तलवारीच्या सहाय्याने जखमी करून पळून गेला होता. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 256/2022 जीवघेणा हल्ला या सदरात दाखल झाला होता.
काल दि.4 एप्रिल रोजी रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दिलीप डाखोरे हा शंभरगाव ता.लोहा येथेच जवळपास आहे. त्यानुसार त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, बालाजी तेलंग, रवि बाबर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, देवा चव्हाण, अर्जुन शिंदे हे लोहाकडे निघाले. रात्री 11 वाजेच्यासुमारास लोहा ते पालम रस्त्यावर निसर्ग लंच होम येथे, मौजे सुनेगाव शिवारात दिलीप पुंडलिकराव डाखोरे हा पोलीस पथकाला भेटला. त्याच्यासोबत माहिती विचारणा करत असतांना त्याने पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्याच कमरेवर लागलेली शासकीय पिस्तुल ओढून घेतली आणि पोलीसांवरच रोखली. तेंव्हा पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपली पिस्तुल काढून त्याच्यावर रोखली आणि त्यास शरण येण्यास सांगितले. पण दिलीप डाखोरे कांही प्रतिसाद देत नव्हता. उलट पोलीसांना पोलीसांचीच बंदुक दाखवून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्याच्या डाव्या पायाच्या पिंडरीवर आपल्या पिस्तुलातून गोळी झाडली आणि त्यास पकडले सुध्दा.
पोलीस उपनिरिक्षक सचिन सुधाकर सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिलीप पुंडलिकराव डाखोरे विरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 353 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी मागील एक महिन्यात असंख्य बंदुका, तलवारी, खोट्या बंदुका असे गुन्हेगारीसाठी वापरला जाणारा मोठा शस्त्रसाठा पकडला तरीपण दिलीप डाखोरेने पिंटु कसबेवर फायरींग केलीच. पोलीसांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला तेंव्हा पोलीसंाचीच बंदुक हिसकावून पोलीसांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणे हा किती मोठा प्रकार आहे. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्याच्या पिंडरीवर गोळी मारून त्याला जखमी केले आणि स्वत:चा आणि आपल्या पोलीसांचा जीव वाचविला. पोलीसांनी सांगितले दिलीप डाखोरे हा कैलाश बिघानिया गॅंगशी संबंधीत आहे.या गुन्ह्याचा तपास लोहा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सय्यद यांच्याकडे देण्यात आला आहे.
संबंधीत बातमी…
