दोन लाख 6 हजारांचा ऐवज जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-विधीसंघर्षग्रस्त बालकांसह आठ गुन्हेगारांना पकडून वजिराबाद गुन्हे शोध पथकाने चोरीचे 17 मोबाईल, एक चांदीची चैन, एक खंजीर आणि एक चोरीची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. हे सर्व चोरटे चोरलेल्या ऐवजाचा वाटा करतांना भांडत होते.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, व्यंकट गंगुलवार, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लुरोड, शेख इमरान, बालाजी कदम यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार 29 एप्रिल रोजी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील शेख अशफाक शेख रजाक रा.नुरी चौक नांदेड सुरज उर्फ सुऱ्या शंकर सोनटक्के रा.कुंभारगल्ली चिखलवाडी नांदेड, शेख सोहेल शेख सत्तार रा.तेहरानगर कॉलनी नांदेड, शेख सोहेल शेख रजाक रा.देगलूर नाका नांदेड, चंद्रकांत प्रकाश नेरले रा.कुंभारगल्ली नांदेड, मदन केशव बटेवाड, रा.कोल्हा ता.मुदखेड आणि दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व चोरटे चोरी केलेल्या ऐवजाचा वाटा करतांना आपसात भांडत होते.
या चोरट्यांकडून पोलीसांनी भाग्यनगर, अर्धापूर, मुदखेड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरलेल्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या. यातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 17 चोरलेले मोबाईल जप्त केले. या चोरट्यांकडून एकूण 2 लाख 6 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या चोरट्यांनी केलेले उमरी येथील दोन दरोड्याचे गुन्हे, भाग्यनगर येथील दोन चोरीचे गुन्हे आणि मुदखेड व अर्धापूर येथील एक-एक चोरीचा गुन्हा असे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हेगारांना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे अर्धापूर, भाग्यनगर व उमरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदी अधिकाऱ्यांनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.