नांदेड(प्रतिनिधी)-एका 18 वर्षीय बालकांने चार जणांच्या धमक्यांमुळे उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्यानंतर चार जणांविरुध्द उस्माननगर पोलीसांनी गुन्हा दखल केला आहे.
शारदाबाई जोगिंदरसिंह चितोडीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गोळेगाव ता.लोहा येथे दोन महिन्यापासून जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करतो. 9 मार्च 2022 रोजी बालाजी गणपती ढाले रा.गोळेगाव ता.लोहा आणि इतर तिघांनी त्यांचा मुलगा बबलु जोगेंद्रसिंह चितोडीया (18) यास मोबाईलच्या कारणावरुन मारहाण केली आणि त्याच्या वडीलास जिवे मारण्याची धमकी दिली. या भितीने बबलुने 9 मार्च रोजीच उंदीर मारण्याचे औषध पिले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत उस्माननगर पोलीसांनी अगोदर आकस्मात मृत्यू दाखल केला होता आणि आता तक्रार दिल्याने बालाजी गणपती ढालेसह चौघांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 323, 504, 506 (34)नुसार गुन्हा क्रमांक 76/2022 दाखल केला आहे. याबाबतचा तपास उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते हे करीत आहेत.
