नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसात मे महिना सुरू होणार आहे. मे महिन्याचा शेवट हा प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अत्यंत महत्वपुर्ण काळ असतो. नांदेड जिल्ह्यात अनेक पोलीस अधिकारी आपली बदली होण्याच्या मार्गावर आहेत, कांही जणांना मुदतवाढ हवी आहे, काही जणांची विहित वेळ पुर्ण झाली नाही पण त्यांच्या बदल्या सुध्दा प्रश्नांकित आहेत. अनेक सुर्याजी पिसाळ आपल्या हातात नांदेड जिल्ह्याची सत्ता मिळावी यासाठी सुध्दा सोरट्या फेकत आहेत. त्यांनी फेकलेल्या सोरट्यामध्ये किती नंबर येतील आणि त्यानुसार आपला प्यादा पुढे चालविण्याची त्यांना संधी मिळेल हे बदल्यांचा विषय पुर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.
दोन दिवसात मे महिना सुरू होणार आहे. एप्रिल महिन्यातच अनेक रेकॉर्ड बे्रक करत उन्हाने कहर माजविलेला आहे. उन्हातील तो तापटपणा मे मध्ये वाढणार असतो. आजच मे पेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. या तापमानात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अर्ज देण्याची तारीख 30 एप्रिल ही सुनिश्चित करण्यात आली आहे. पुढे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अधिकाऱ्यांच्या बदल्याचा हंगाम सुरू होतो. त्यासाठी आपण फेकलेल्या सोरट्यांवर आपल्याला अपेक्षित नंबर यावा आणि त्या नंबर नुसार आपला प्यादा पुढे चालत जावा अशी तयारी करण्यात अधिकारी 1 मेच्या कामगार दिनानंतर कामाला लागतील.
विशेष करून पोलीस दलात या बदल्यांबाबत जास्त महत्व आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आज नांदेड जिल्ह्यात कार्यरत आहेत. मे 2022 च्या महिन्यात या चौघांचाही कार्यकाळ पुर्ण होत नाही. पण यांच्या बदल्यांसाठी बियाणी हत्याकांड एक कारण असू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन सुध्दा 6 जूनपर्यंत जाणार आहे असे भाकित नारायण राणे यांनी केले आहे. त्यांचे भाकित किती खरे आणि किती खोटे ठरणार हे 6 जून नंतरच कळेल. पण सरकारमध्ये येणार कोण यावर सुध्दा नांदेड जिल्ह्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर विचार होईल.
यदा-कदा सरकार बदलले तर मग मात्र या चौघांच्या बदल्या होणारच हे निश्चित आहे. त्यात कांही सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर या वृत्तीच्या व्यक्ती आपल्याकडे पद उपलब्ध नसेल तरी पण आपल्याला महत्वाची जागा अतिरिक्त कार्यभारात मिळावी यासाठी जोर लावतील. सरकार बदलेल तेंव्हा बदलेल पण तो पर्यंत बदल्यांचा हंगाम संपला तर सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर या वृत्तीच्या अधिकाऱ्यांची संधी सुध्दा जाणारच. अवैध धंदे करणारे एकत्रितपणे सुर्याजी पिसाळसारखाच व्यक्ती नांदेड जिल्ह्याचा पोलीस अधिक्षक असावा असे आपसात बोलत आहेत. कारण सुर्याजी पिसाळ असला तर त्यांच्या कामाला बंधन आणण्याची ाकोणाची हिंमत शिल्लक राहणार नाही आणि लोकशाहीची वाट लागण्यात कोणीच कांही कसर शिल्लक ठेवणार नाही. त्यामुळे सध्या तरी नांदेड जिल्ह्यात पोलीस दलाचा कारभार आपल्या हातात मिळावा यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरू आहेत. एक विचारवंत म्हणतो, “उसने जब किल ठोकी मेरे दिल मे, बडीही आदासे उसने किल को आरपार किया.’ अशा पध्दतीचा कारभार झाला तर हा खिळा कोणाच्या छातीत ठोकला जाईल आणि कोण अभिनय करून त्याला आरपार करील हे बदल्यांचा हंगाम संपल्यानंतर लक्षात येईल. खऱ्या अर्थाने जे नांदेड जिल्ह्याचे मालक आहेत त्यांनी या बाबीकडे अत्यंत बारकाईने पाहण्याची गरज आहे. आपल्यासाठी अधिकाऱ्यांचा उपयोग झाल्यानंतर त्यांना हसत मुखाने निरोप देण्याऐवजी त्यांच्यातील पात्रता त्या मालकांनी तपासायला हवी कारण सर्वात जास्त गरज लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची आहे.
