नांदेड(प्रतिनिधी)-रात्रीला हळदीच्या शेतात जागलीसाठी थांबलेल्या आणि झोपेत असलेल्या शेतकऱ्याला उठवून 20 लाखांची खंडणी मागून त्याचा मोबाईल व 2600 रुपये लुटणाऱ्या दोन व्यक्तीविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुंडलिक हरिश्चंद्र कपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 एप्रिलच्या रात्री ते आपल्या हळदीच्या शेतात जागलीसाठी गेले होते आणि नंतर त्यांना झोप लागली. मध्यरात्रीच्या काळात त्यांना दोन जणांनी बळजबरीने हातपाय बांधून जवळच्या ज्वारीच्या शेतात नेले. मारहाण केली आणि 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. 20 लाख रुपये नाहीत असे सांगितल्यावर मारणाऱ्यांनी त्यांच्या खिशातील 2600 रुपये, एटीएम कार्ड आणि मोबाईल लुटून नेला. मनाठा पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 364(अ), 387, 394, 342 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 82/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक चिटेवार हे करीत आहेत.
