आरपीआय नांदेड शहराध्यक्षपदी धम्मपाल धुताडे
नांदेड(प्रतिनिधी)-सर्व राजकीय पक्ष आणि व्यक्तीगत माणसे यांना शॉर्टकटमध्ये लवकर श्रीमंत होण्याची स्पर्धा नांदेडमध्ये लागली आहे. या स्पर्धेतून एकमेकांच्या व्यवसायावर लुटालुट करण्याचे प्रकार सुरू झाले अशा परिस्थितीत नांदेडमधील सर्वच अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे यांनी केले. आज नांदेड शहराध्यक्षपदी धम्मपाल धुताडे यांची नियुक्ती केल्याचेही सांगितले.
आरपीआय आठवले गटाच्यावतीने बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजयदादा सोनवणे यांच्या सोबत मिलिंद शिराढोणकर , गौतम काळे, संजय भालेराव आणि धम्मपाल धुताडे यांची उपस्थिती होती. आपल्या पक्षाची भुमिका आणि पुढील येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाची तयारी सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलविण्यात आली होती. सर्वप्रथम धम्मपाल धुताडे यांना आरपीआय पक्षात प्रवेश देवून त्यांना नांदेड जिल्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे सांगितले. यापुर्वीचे शहराध्यक्ष शिवाजी भालेराव यांना राज्य कार्यकारणीत पाठविणार असल्याचे विजयदादा सोनवणे सांगत होते.
नांदेड शहरात शॉर्टकटमध्ये श्रीमंत होण्याच्या विविध मार्गांची स्पर्धा लागली आहे. त्यात अनेक राजकीय पक्षांचे व्यक्ती, खासगी व्यक्ती सहभागी आहेत. त्यातूनच एक दुसऱ्यांच्या व्यवसायावर दरोडे टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे हे सांगतांना जुगार अड्ड्यांचा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे नांदेड शहरातील संपुर्ण अवैध धंदे बंद होण्याची गरज असल्याचे विजयदादा सोनवणे म्हणाले.
मशीदीवरील भोंग्यांना आरपीआय सुरक्षा देणार आहे. तसेच मशीदीवरील भोंगे, मंदिरावरील भोंगे, बौध्द विहारांवरील भोंगे तसेच सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळावर असलेले सर्व भोंगे तसेच राहावेत कोणतेही भोंगे काढण्यात येवू नयेत असे आरपीआयची भुमिका असल्याचे विजयदादा सोनवणे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यासंदर्भाने ज्या पध्दतीने आंदोलन सुरू केले आहे. त्याच्याविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी आरपीआय आंदोलन करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने इतर धर्मियांना आपल्या भोंग्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे असे विजयदादा सोनवणे यांना वाटते.
संजय बियाणी यांची हत्या होवून आज 18 दिवस झाले तरी मारेकऱ्यांचा पत्ता पोलीसंाना लागलेला नाही. त्यामुळे पोलीसांपेक्षा मारेकऱ्यांचा गु्रप जास्त स्ट्रॉंग असल्याचे दिसते. म्हणूनच तो शोध लांबत चालला आहे. संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांचा शोध त्वरीत लागावा असे विजयदादा सोनवणे म्हणाले. पंतप्रधान योजनेतील घर मिळणाऱ्या लोकांना मोफत मध्ये वाळू मिळावी अशीही आरपीआयची भुमिका असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टीसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची राजकीय युवती आहेच आणि ती कायम राहिल असे विजयदादा सोनवणे यांनी सांगितले.
पक्षासाठी मजबुती जमवणार-धम्मपाल धुताडे
मी मागील 17 ते 18 वर्षापासून राजकीय प्रवास करीत आहे. या प्रवासात मी राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षात काम केले. तेथे माझ्या समाजासाठी मला कांही करता आले नाही म्हणून मी रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निळा झेंडा आता हातात घेतला आहे. माझ्यानंतर प्रभागनिहाय नवीन कार्यकारणी तयार करून पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबुतीने कामगिरी करेल असे धम्मपाल धुताडे यांनी सांगितले.