ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

कौठा भागातील एका सदनिकेत 5 लाख 50 हजार रुपयांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज दि.22 एप्रिल रोजी दुपारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका घरात झालेल्या चोरीत जवळपास 5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. खास बाब म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षकाला कॉल करून घडलेल्या घटना सांगितल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी आता सायंकाळच्यावेळेस काम सुरू केले आहे.
प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार रविनगर कौठा भागात असलेल्या जयापार्वती अपार्टमेंट या इमारतीमध्ये अनिल खियाणी यांचा एक फ्लॅट आहे. दुपारी 11 ते 12 या वेळेदरम्यान एक लहान बालक रडत असल्याने त्या घरातील एकट्या महिलेने आपल्या घराची कडीलावून ती शेजारी असलेल्या फ्लॅटमध्ये गेली. काही वेळातच ती महिला परत आली तर घराचे दार उघडे दिसले. आत पाहिले असता घरातील कपाटे फोडलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार घरात 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम, जवळपास 2 लाख 50 हजार रुपयांचे दागिणे असा जवळपास 5 लाख 50 हजार रुपयंाचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे.
नांदेड जिल्ह्यातून बदलून दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरिक्षकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ड्युटी ऑफीसरला घडलेली घटना सांगितल्यानंतर ड्युटी ऑफीसर पोलीस उपनिरिक्षक उत्तम बुक्तरे तेथे पोहचले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ठसे तज्ञ आणि श्वान पथक बोलावण्यात आले होते. पण श्वान पथक कुठपर्यंत माग काढू शकले याची माहिती प्राप्त झाली नाही. एवढ्या मोठ्या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सुध्दा घटनास्थळी पोहचले आहेत. वृत्तलिहिपर्यंत पोलीस पथक घटनास्थळी हजर आहे. कायदेशीर प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *