लेख

ललित शब्दात बोलून पोलीस ठाण्याचे काम चालविणारे साहित्यीक पोलीस निरिक्षक भगवान धबडगे

पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारास आणि विरोधी पक्षाच्या लोकांना ललित  साहित्यातील शब्दांचा उपयोग करून त्यांचे समाधान करण्यात तरबेज असणारे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे. आपल्या जीवनात कधी प्रेमळ तर कधी भेदक, कधी तडाल तर सदल, कधी पाणेरी तर काजळी आणि कधी-कधी वाटे सुमनभार अशा पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करत पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक असे पद धारण करणाऱ्या पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना जन्मदिनाच्या शुभकामना आम्ही आमच्या शब्दांच्या माध्यमाने व्यक्त करताना असे सांगायचे आहे की, आम्हाला स्वातंत्र्य कसे मिळाले याचे शिक्षण घेण्याऐवजी आम्ही गुलाम कसे झालो याचे शिक्षण जास्त महत्वपूर्ण आहे.

टाकळगव्हाण ता. औंढा जि. हिंगोली येथे 20 एप्रिल 1965 रोजी मरीबाजी आणि राधाबाईजी यांच्या जीवनात एक फुल उमलले, त्याचे नाव त्यांनी भगवान असे ठेवले. मरीबाजी आणि राधाबाईजी यांच्या कुटूंबात 4 मुली आणि 2 मुले असा बहर होता. टाकळगव्हाणच्या जिल्हा परिषद शाळेत आपले शिक्षण घेताना भगवान धबडगे यांनी मनाने नाही तर बुद्धीने विचार केला आणि शिक्षणाची त्यावेळेसची गरज लक्षात घेत आपले शिक्षण सुरू ठेवले. आठवी ते दहावीचे शिक्षण त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार या गावात घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय परभणी येथे त्यांनी प्रथम कला शाखेतील पदवी प्राप्त करून पुढे समाज कार्यात पारांगत (एमएसडब्ल्यू) ही पदवी प्राप्त केली. आपल्या शिक्षणाच्या काळात त्यांना मिळणाऱ्या सुविधा त्यांनी कधीच इतरांशी तुलनात्मकदृष्टया जोडल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना  आपल्याकडील सुविधा कमी आहेत, यापेक्षा आपल्याला शिक्षण महत्वाचे आहे, हे जाणुन घेतले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा तुमच्याकडे दोन असतील तर एक रूपयाची भाकरी घ्या आणि एक रूपया पुस्तकासाठी खर्च करा असा संदेश दिलेला होता. या संदेशाच्या आधारावर भगवान धबडगे यांनी जेवणाच्या चिंतेसोबत त्याचबरोबरीने शिक्षणाची चिंता केली आणि आपले शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मोठा प्रश्न होता काम मिळविण्याचा. त्यावेळी सन 1988 परभणी जिल्हा होता. तेव्हा त्यांनी 1988 मध्ये पोलीस भरतीत प्रवेश केला आणि आपले काम सुरू केले. खाकी वर्दी धारण केल्यानंतर त्या वर्दीला साजेसे वर्तन त्यांनी ठेवले. त्यांच्या या उत्कृष्ट वर्तनाच्या परिणामात सुलोचनाजीसोबत त्यांचे लग्न 1990 मध्ये झाले. आपली पोलीस जबाबदारी आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना भगवान आणि सुलोचनाजी यांच्या जीवनात सुशीलकुमार आले. भगवान धबडगे यांनी आपल्या शिक्षणाप्रमाणेच शिक्षणाची मार्गदर्शक दिशा सुशीलकुमारला दाखविली. त्यांना ज्या सुविधा आवश्यक असतील त्या सर्व दिल्या आणि सुशीलकुमारने सुद्धा आपल्या वडिलांच्या प्रयत्नांना उत्तर देताना बी.ई. इलेक्ट्रीकल्स ही पदवी प्राप्त केली. शैक्षणिक विषय हा धबडगेंच्या जीवनात अत्यंत महत्वाचा होता आणि तो त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडत, स्वत: तर यश मिळवलेच पण मुलाला सुद्धा त्यात यशस्वी होण्यासाठी आधार दिला.
1998 मध्ये झालेल्या विभागीय परीक्षेत भगवान धबडगे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. ही गवसणी घालताना आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्या नुकसान देण्यासाठी येत नाहीत तर त्या समस्या आपल्या आत लपलेल्या शक्तींना आणि सामर्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात ही बाब आपल्या डोक्यात ठेऊन धबडगेंनी मिळवलेले पोलीस उपनिरीक्षक पद त्यांच्या कक्षेत येण्यास वर्षे लागली. तरी पण त्यातून काही वाईट विचार न करता आपण केलेल्या संघर्षचं आपल्या प्रगतीचं आमंत्रण आहे आणि जो त्या आमंत्रणाला स्वीकारतो तोच पुढे जातो अशा पद्धतीने अखेर भगवान धबडगे यांना सन 2004 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त झालेचं.

पोलीस उपनिरीक्षक पद मिळविल्यानंतर भगवान धबडगे यांनी आपल्याच जिल्ह्यातील हट्टा येथे काम केले. पुढे वाशिम जिल्ह्यात केले आणि त्यानंतर लातूरच्या स्थानिक गुन्हा शाखेत आपली सेवा केली. सन 2011 मध्ये त्यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळविली आणि राज्य गुप्त वार्ता विभागात काम केले. सन 2017 मध्ये पोलीस निरीक्षक पदाची पदोन्नती प्राप्त झाली आणि त्यांनी औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यात पाचोड पोलीस ठाण्यात आपल्या सेवा दिल्या. पुढे ते नांदेड जिल्ह्यात आले. नांदेड जिल्ह्यात त्यांनी प्रथम बिलोली, देगलूर पोलीस ठाण्यात काम केले. त्यानंतर त्यांना नियंत्रण कक्षात नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली. काही काळानंतर त्यांना पोलीस कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली, तेथेही त्यांनी दखल घेण्याइतपत कार्य केले. त्यानंतर मार्च 2022 मध्ये त्यांना इतवारा पोलीस ठाण्याच्या जबाबदारी देण्यात आली आहे आणि सध्या ते इतवारा येथे काम करत आहेत. आपल्या सर्व पोलीस सेवा काळात विश्वास या शब्दातील विष आणि आस या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यातून विष घ्यायचे की आस घ्यायचे याची सांगड घालत त्यांनी तयार केलेल्या विश्वासाचा परिणाम झाला की सन 2015 मध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय पोलीस सेवेसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले. त्यानंतर सुद्धा आपल्या पोलीस कामात दुसऱ्याला आनंदी बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन अत्यंत निरोगी मन असल्याचे लक्षण त्यांच्यात आहे. या आपल्या विचाराला पुढे नेतांना कोणालाही चुकीचे म्हणण्याअगोदर त्यांनी नेहमी विचार केला आणि प्रत्येकाच्या विचाराला समजून घेतलं आणि त्याचे विचार माझ्यापेक्षा वेगळे आहेत पण तो चुकीचा नाही ही भावना बाळगून मी या पोलीस जीवनात चांगलेच करणार आहे या विचारांवर भर देत हसतमुखाने आपल्या कामाला प्रत्यक्षात आणले. त्याचा परिणाम सुद्धा तेवढाच सुंदर झाला आणि सन 2020 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक त्यांच्या गळ्यात येऊन स्थिरावले. आजही त्यांच्या छातीवर हे पोलीस पदक अत्यंत उठून दिसते.

मेहनत करत संपत्ती कमवणे, संयम राखून काम करणे, गोड बोलून ओळख बनवणे आणि कमवलेल्या आदराने नाव बनवणे या चार सुत्रींच्या आधारे आजही भगवान धबडगे अत्यंत जोरदारपणे आपला आनंद दाखवत असतात. हा आनंद दाखवताना इतरांच्या जळावू वृत्तीवर त्यांनी कधीच लक्ष दिले नाही, म्हणून त्यांच्या जीवनातील आनंद कायम राहिला. आपल्या जीवनात पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या पदाची जबाबदारी स्वीकारतांना वयाचा कधीच विचार केला नाही आणि घामाने अंघोळ केल्यानंतरच इतिहास बदलतो या उक्तीला लक्षात ठेऊन आपल्या कामगिरीचा ध्वज फडकवत राहिले. आपल्या कामासोबत त्यांनी नेहमी सत्यता बाळगली. त्यांनी जो कुणी शक्तीमान ईश्वर आहे त्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच आपल्या पोलीस जीवनातील भविष्यासाठी त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच यश त्यांच्या पायावर लोळत आहे. आपल्या जीवनात मला कोणताही किनारा मिळाला नाही तरी मी इतरांना बुडवून पोहणे शिकणार नाही हा विचार मनात बाळगत भगवान धबडगेंचा हसरा चेहरा त्यांचा रूबाब वाढवतो आणि त्यांनी हसतमुखाने केलेल्या कामामुळे त्यांची ओळख सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपले जीवन पेन्सिलसारखे आहे ती सुद्धा दररोज लहान-लहान होत असते. त्याचप्रमाणे जीवनाचे आहे म्हणून आपल्या जीवनात गुलाबांचा अट्टहास न करता काट्यांचा आदर करण्याची वृत्ती भगवान धबडगेंमध्ये जुळली आणि वळणा-वळणाच्या वाटेवर आपल्याला वळावेच लागते. म्हणून त्यांची आजपर्यंत वाटचाल अत्यंत प्रभावी आणि योग्य दिशेला मार्गक्रमण करीत आहे. कुणी तुमची सेवा करून तुमच्यावर उपकार केले असतील तर पैसे देऊन त्याचे ऋण फेडता येत नाहीत, त्याचे उत्तर त्याची सेवा करूनच देणे असते या बाबीला आपल्या जीवनात महत्व देणाऱ्या भगवान धबडगेंनी प्रखरपणे या बाबीला आपल्या जीवनात उतरविले. त्यांच्या वृत्तीनेच त्यांना मोठे केले. कारण आम्हाला गुलाबासारखे व्हायचे आहे तर काट्यांशी आमचा ताळमेळ अत्यंत आवश्यक आहे. ती कला अवगत करून भगवान धबडगे यांनी आपल्या जीवनात केलेली वाटचात आज त्यांना नामांकित जागेवर आणुन ठेवली आहे. आपले पाय जमिनीवर रोवून ठेवत त्यांनी आपली नजर नेहमीच आकाशावर ठेवली आणि त्यानुसार मार्गक्रमण ते आजही करत आहेत. पोलीस म्हणून निवड झाली तेव्हा त्यांनी त्या पोलीस कामात आपली आवड निर्माण केली आणि आत्मविश्वास सदा जागृत ठेवला आणि त्यामुळेच त्यांना पोलीस सेवा काळात कोणतीही गोष्टी कधी अवघड वाटली नाही. आपल्या आत्मसन्मानासोबत जगताना त्यांनी स्वत:ची ओळख तयार केली. नाहीतर या जगात दु:खाची प्रतिमा खरेदी करण्याची सवय या समाजाला आहे. या समाजात जगताना आपली लहानशी ओळख त्यांनी महत्वाची मानली आणि ती स्वत: तयार केली. आपल्या जीवनात आपण प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येक पहिल्या प्रयत्नाला यश येत नाही. पण ज्या क्षणाला यश येते त्या यशामध्ये पहिल्या प्रयत्नाचा सुद्धा तेवढाच मोठा सहभाग असतो.
त्यांनी लातूर जिल्ह्यात असताना अंधविश्वासातून दोन खुन झाले. लातूर जिल्हा, महाराष्ट्र त्यामुळे हादला होता. कारण दोन मुंडके कापून वेगवेगळया रिंगणात ठेवून तो काहीतरी अंधश्रद्धेचा प्रकार घडला होता. फक्त मुंडक्यावर त्या माणसाची ओळख कशी होणार, धड सापडत नव्हते आणि पोलिसांसाठी हे मोठे आव्हान उभे राहिले. मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांनी या दोन खुनांचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भरपूर मेहनत  घेतली होती. परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा मी आता बाहेर जात आहे, तुम्ही या प्रकरणात चौकशीसाठी आणलेल्या लोकांना चौदावे रत्न दाखवू नका अशी समज देऊन वरिष्ठ अधिकारी गेल्यानंतर भगवान धबडगे यांनी त्यातील एक-एकाला वेगवेगळ्या खोलींमध्ये बसविले. अत्यंत मार्मीक शब्दांत त्यांच्याकडून विचारणा केली आणि भविष्यातील त्यांना येणाऱ्या अडचणी समजून सांगितल्या आणि त्यातील एक फुटलाच आणि 40 किलो वजनाच्या माणसाने हे दोन केल्याची घटना समोर आली. त्याने एक गाडी बसवकल्याण, कर्नाटक बसस्थानकावर उभी केलेली एक दुचाकी गाडी सुद्धा त्यावेळी जप्त करण्यात आली होती. पण वरिष्ठ अधिकारी थकल्यानंतर अत्यंत छोट्‌याशा प्रयत्नात भगवान धबडगे यांनी मग धड शोधून काढले आणि या गुन्ह्याची उकल झाली.
अशाच दुसऱ्या एका प्रकरणात समाज कल्याण सभापतीच्या सुपूत्राच्या दोन दारू दुकान होत्या. त्याचे अनेक मित्र होते त्या सर्वांनी आपल्या मित्राला एका टेकडीवर नेऊन दारू पाजवून त्याचा खून केला आणि त्याच्या बापाकडे 20 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. सभापती हे सार्वजनिक व्यक्तीमत्व असल्याने या प्रकरणाला मोठा दबाव तयार झाला. मुलगा शोधणे हे खूप महत्वाचे होते. तेव्हा त्याच्या काही मित्रांना आपल्या ताब्यात घेऊन भगवान धबडगे यांनी त्यांच्या डोळ्याच्या हालचालीवरून हेरले की, कोण आपली मदत करणार आहे आणि त्यांची हेरगिरी अखेर यशस्वी ठरली आणि एक मित्र पोलिसांच्या मदतीला तयार झाला त्याने कागदावर लिहून संपूर्ण कहानी दिली. त्यात आपल्या मित्राचा खुन कसा केला त्याचे प्रेत कुठे टाकले ही सर्व माहिती उघडकीला आली. याचा परिणाम असा झाला लातूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी पोलिसांविरूद्ध निघणारा मोर्चा रद्द करण्यात आला. बिना नकाशाची पाखरे आपल्या मुक्कामी पोहचतात. आपण तर माणसं आहोत. आपल्याकडे शिक्षणाचा आधार आहे या सर्व गोष्टींवरून त्यांनी मिळविलेले यश महत्वपूर्णच आहे.

नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात असताना त्यांनी केलेले एक उल्लेखनीय काम असे आहे की, एका भुखंडावर दोन जणांनी आपला हक्क घेऊन पोलीस ठाण्यात आले. तेव्हा त्यांनी त्या अर्जाची चौकशी एका पोलीस अंमलदाराकडे दिली. पोलीस विभागात काही मंडळी ही सुर्याजी पिसाळ, मिर सादीक, मिर जाफर वृत्तीची आहेतच. त्यानुसार त्या पोलीस अंमलदाराने दोन्ही लोकांकडून पैसे घेतले आणि भगवान धबडगे यांना एका व्यक्तीचीच ही जागा आहे असे सांगितले. आपल्या चाणाक्ष नजरेने भगवान धबडगे यांनी त्यांनी ती पोलीस अंमलदाराचा अहवाल आवडला नाही म्हणून दोन्ही लोकांना आपल्यासमोर आणण्यास सांगितले. त्यातील एक दवाखान्यात होता तो आपल्या हातात लघवीची पिशवी घेऊनच पोलीस ठाण्यात आला. त्याला केलेल्या विचारणेतून बरेच सत्य बाहेर आले आणि त्यानंतर आपल्या पोलीस अंमलदारांची अत्यंत सुंदर शब्दांत भगवान धबडगे यांनी केलेली आरती आजही बोलली जाते. त्यावेळी त्या आरतीतील अनेक शब्द असे आहेत की, आम्ही आता लिहू शकत नाही. पण ते शब्द वापरणे आवश्यकच होते. कारण विचारवंत सांगतो शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो. शब्दांत शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला सुसंवाद होतो, असा शब्दांचा संवाद घडवत ते भुखंड प्रकरण निकाली काढले होते.
देगलूर येथे कार्यरत असतांना भगवान धबडगे यांच्याकडे एक महिला आली. कोणताही अर्ज नाही, कांही तक्रार नाही पण माझा नवरा परत मिळवून द्या एवढीच त्या महिलेची विनंती होती. 10 वर्षापासून ती महिला आपल्या नवऱ्या बिना एकटी राहत होती. कोणताही अर्ज नसतांना पोलीसांना काम अवघडच असते. तेंव्हा एक अर्ज त्या महिलेकडून लिहुन घेण्यात आला आणि तिच्या नवऱ्याची माहिती घेतली तेंव्हा समजले की, त्याला फक्त दारु पिण्याची सवय आहे. बाईकडून पैसे घेवून ते दारुमध्ये उडवणे हा त्याचा नाद आहे. भगवान धबडगे स्वत: त्या माणसाला शोधण्यासाठी मागे लागले. याबाबीचा सुगावा लागताच आपल्याला आता काय होईल याची भिती त्याच्या मनात बसली. अखेर एका दिवशी तो सापडलाच त्यावेळी भगवान धबडगे यांनी त्याला जगात सर्वात सुंदर धुन आपल्या हृदयाची आहे कारण ती धुन देवाने बनवली आहे. तेंव्हा फक्त तिचेच ऐका हा संदेश दिला. दिलेला संदेश त्या दारुड्या व्यक्तीने आपल्या मनात बसवला आणि कोणतीही कायदेशीर कार्यवाही न तो आपल्या पत्नीसोबत आनंदाने आज सुध्दा जीवन जगत आहे. या संदर्भाने एक विचारवंत म्हणतो की,  जेंव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडून काही अपेक्षा करते तेंव्हा त्याला तुम्हीच त्याची कारणे दिलेली असतात हे सिध्द झाली.
देगलूरमध्ये एका महिलेला लुटून लाखो रुपयांचे दागिणे पसार करण्यात आले. महिला वयस्कर होती. त्यांच्या घरी काम करण्यासाठी एक महिला ठेवण्यात आली होती. पण तिचा कांही थांगपत्ता उपलब्ध नव्हता. भगवान धबडगे यांनी ती महिला एका युवकाच्या संपर्कात होती. पोलीसांनी त्या युवकाचा शोध लावला. त्याचा मोबाईल नंबर मिळवला. पण तो मोबाईल कधी-कधी चालू करायचा. यासाठी तांत्रिक मदत घेण्यात आली. पण एकदा भगवान धबडगे आणि त्याचे बोलणे झाले. आपल्या कौशल्यपुर्ण बोलण्यात भगवान धबडगे यांनी त्याला आपलेसे केले पण पुन्हा तो फोन बंद झाला. तांत्रीक मदतीने तो तिरुपती ते हावडा जाणाऱ्या रेल्वे गाडीत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्या गाडीला कर्नाटक राज्यातील हुमणाबाद येथे गाठण्याचा प्रयत्न केला. पण नियोजनात कांहीसा फरक पडला आणि ती गाडी पुढे निघाली. चालत्या रेल्वे गाडीचा पाठलाग करून पोलीसांनी क्रॉसींगसाठी ती गाडी एका रेल्वे स्थानकासमोर थांबली तेंव्हा त्यातून महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न करून तिचे 1 लाख 60 हजारांचे दागिणे लुटणाऱ्या महिलेस तिच्या प्रियकराला पकडले. खाकी वर्दीला आपले प्राण समजून जबाबदाऱ्या पुर्ण करतांना वाटेवर येणाऱ्या वळणांवर योग्य रितीने वळण घेवून धबडगे यांनी पुर्ण केलेले हे काम त्यांच्या जीवनात आनंद देणारे आहे. यासाठी त्यांना कांही मिळणार नाही पण जीवन हे पेन्सिलसारखे आहे ते दररोज लहान-लहान होत राहते. तरीपण या जीवनाचा पुर्ण आनंद घेत त्यांनी आपली सेवा दिली आहे.

स्थानिक गुन्हा शाखेने कांही दरोडेखोर पकडून आणले असतांना आपण कोण-आपण कोण अशी चर्चा भगवान धबडगे त्या दरोडेखोरांशी करत असतांना एक पत्रकार महोदय पण आले. तेवढ्यात दरोडेखोरांमधील एका युवकाचे वडील आले. त्या वडीलाची आणि पत्रकाराची अगोदरच भेट होती. तेंव्हा पत्रकाराने भगवान धबडगेकडे साहेब माझ्या मित्राचा मुलगा आहे याचा सोडा अशी मागणी केली. या मागणीला भगवान धबडगे यांनी दिलेले उत्तर अत्यंत बोलके आहे. भगवान धबडगे म्हणाले साहेब सोडले असते हो..पण हा गरीबाचा मुलगा हवा होता. याचा वडील तर कंत्राटदार आहे. तेंव्हा तुम्ही दोन्ही वडील आणि पुत्राचा फोटो काढा आणि तो पेपरमध्ये छापा म्हणजे आपले मुलाने केलेले शौर्य या वडीलांसह जगात माहित होईल. यावरून असे दिसते की, जगात समस्या ही नाही की, खरे बोलणाऱ्यांची कमतरता झाली आहे. परंतू खरी समस्या ही आहे की, आपल्या मर्जीचे ऐकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तो वडील आणि तो पत्रकार एका क्षणात भगवान धबडगेपासून दुर गेले कारण त्यांनी त्या दोघांच्या मर्जीविरुध्द बोलले होते.
20 एप्रिल हा भगवान धबडगे यांचा जन्मदिवस त्यांना आपल्या शब्दातून जन्मदिनाच्या शुभकामना देतांना असे नक्की सांगायचे आहे की, आपल्या जीवनात स्वत:च्या समजुतदारपणामुळे तुम्ही वाढवलेल्या मित्र परिवाराची संख्या दिवसेंदिवस वृध्दींगत होवो. एक विचारवंत म्हणतो की, “दरीया बनकर किसीको डुबानेसे अच्छा है । जरीया बनकर किसको बचाया जाये।’ या परिस्थितीत आपण पुर्णपणे स्थिर आहात असे आमचे मत आहे. पण सामाजिक शांततेत विघ्न तयार करणाऱ्यांना तुम्ही अत्यंत कठोरतेने वाघावे अशी अपेक्षा आहे. जीवनात सर्वात सुंदर कांही अनुभव असेल तर तो इतरांच्या आनंदाचे कारण बनने हा आहे आणि हे कारण आपल्यात पुर्णपणे भरलेले आहे. याची आम्हाला कल्पना आहे. जीवनात वादळ हे कधीच थांबणार नसतात आणि त्यांच्या भितीने आपण कधीच घर बदलत नाही. मनात काचांची भिती न बाळगता आपल्या पश्चातापात कोणतेही दगड न राखता जगणे महत्वपूर्ण आहे. कारण जखमी करणारे काच कधी बदलणार नाही आणि आपल्याला वेदनेचे प्रहार देणारे दगडही कधी बदलणार नाहीत. तेंव्हा आपल्या जीवनात घडणाऱ्या बदलांना सकारात्मक प्रतिसाद देत आपण दमदारपणे जीवन जगावेत याच शुभकामना. जीवनात सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारे माधुर्य आणि समाधान हे अतुलनिय असते हे आपल्यासमोर मांडतांना आम्हाला सांगायचे आहे की, केवळ योगा-योग असे कांही नाही, जीवनात प्रत्येक घटनेला अर्थ असतो. त्या अर्थाला आपण आपल्यासोबत बाळगले तर कधीच अडचणी येणार नाहीत. एक हिंदी विचारवंत सांगतो की, “तराशने वाले को हमारी अच्छाई, और  तलाशने वाले को हमारी बुराई नजर आती है।’ कोणताही विचार न करता आपण आपले धैर्य ठेवूनच जगला आहात आणि यापुढे सुध्दा जगत राहा या आपल्या जन्मदिनी आमच्या हार्दिक शुभकामना..
शेख असद
पोलीस उपनिरिक्षक
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *