ताज्या बातम्या विशेष

बिलोलीच्या जिल्हा न्यायाधीशांनी आपले सासरे-सासु-मेहुणे यांच्याविरुध्द दाखल केला गुन्हा

इतरांना न्याय देणाऱ्या न्यायाधीशांची पत्नी इतर न्यायाधीशांकडे न्यायासाठी उंबरठे झिजवत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-माझे सासु-सासरे आणि मेहुणा माझ्या पत्नीला मिळणाऱ्या पोटगीच्या रक्कमेचा अपहार करण्यासाठी तिला विविध प्रकारे भडकावतात अशा आशयाचा अर्ज जिल्हा न्यायाधीश स्तराच्या व्यक्तीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिला. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. नांदेडच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम अटकपुर्व मंजुर केला आहे. याप्रकरणाचा तपास सुध्दा जज साहेबांनी भाग्यनगर पोलीसांकडून बदलायला लावला आहे. जजसाहेबाविरुध्द नांदेड न्यायालयात पत्नीने सुध्दा खटला दाखल केलेला आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील जिल्हा न्यायाधीश दुर्गाप्रसाद राजेश्र्वर देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिलच्या रात्री प्रेमनगर तरोडा खुर्द भागात त्यांच्या घरात त्यांचे सासरे चंद्रकांत गंगाधर पाटील (70) सासू सुरक्षा गंगाधर पाटील (65), मेहुणे विजय गंगाधर पाटील (42) या तिघांनी त्यांच्या घरात बळजबरीने प्रवेश करून त्यांच्या पत्नीकडून त्यांच्याविरुध्द खोट्या तक्रारी करण्यास उद्युक्त केले. त्यांच्या पत्नीला मिळणारे पोटगीतून स्वत:चा चरीतार्थ चालविण्यासाठी बेकायदेशीर घराचा ताबा मिळवला. पत्नीला मिळणाऱ्या पोटगी रक्कमेत अपहार करता यावा म्हणून त्यांनी हे सर्व काम केले आहे.

यातक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 119/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 447, 451, 452, 384, 109, 120 (ब) आणि 34 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक वाठोेरे यांच्याकडे देण्यात आला होता. हा गुन्हा 11 मार्च रोजी 02.31 वाजता दाखल झाला. आजच्या परिस्थितीत प्राप्त केलेल्या माहितीनुसार हा गुन्हा तपासासाठी दुसरीकडे वर्ग करावा अशी मागणी केल्यानंतर हा गुन्हा इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षकांकडे पाठविण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण पोलीस विभागाकडून या प्रक्रियेला कोणी दुजोरा दिला नाही.

11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 18 एप्रिल रोजी चंद्रकांत गंगाधर पाटील (70), सुरक्षा गंगाधर पाटील (65) आणि विजय गंगाधर पाटील (42) सर्व रा.औरंगाबाद या तिघांनी नांदेड जिल्हा न्यायालयात फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 345/2022 दाखल केला.या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी तिघांना अंतरीम अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 एप्रिल 2022 रोजी होणार आहे.

सध्या बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश असलेल्या दुर्गाप्रसाद राजेश्र्वर देशपांडे यांची बदली संगमनेर येथे झाली आहे. त्यांच्या पत्नीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याविरुध्द कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-2005 मधील कलम 17, 18, 19, 20 आणि 22 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात नुकसान भरपाई मिळावी, घरगुती जुलूम परत होवू नये असा आदेश व्हावा. जज दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी तक्रारदारा सोबत पुन्हा संपर्क करू नये असा आदेश व्हावा. पोटगी मिळावी अशा अनेक मागण्या त्या अर्जात आहेत. दुर्गाप्रसाद देशपांडे यांच्या पत्नीने सांगितले की, बदली झाल्यानंतर माझी 13 आणि 10 वर्षांच्या दोन बालकांच्या शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (टी.सी.) मला कांही माहिती न देता दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी पोलीसांना पाठवून काढून घेतल्या आहेत. मला त्यांच्यासोबत संगमनेर येथे जायचेच नाही तर माझ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अधांतरीच राहणार आहे. एकूणच जिल्हा न्यायाधीश स्तराच्या कुटूंबात चाललेल्या या वादळाला आता न्यायालयीन प्रक्रिया आणि गुन्ह्यांच्या नोंदीमुळे सार्वजनिकीकरण झाले आहे. ज्या व्यक्तीला इतरांसाठी न्याय देण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यांचीच पत्नी इतरांकडे न्याय मागत फिरत आहे. या प्रकरणात श्रीमती देशपांडे यांच्यावतीने ऍड.दिलीप मनाठकर काम पाहत आहेत.

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *