नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. नांदेडचे तापमान 42 अंशावर असतांनाही विविध ठिकाणच्या मंदिरात श्री हनुमान दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. तसेच महाप्रसादाच्या झालेल्या ठिकठिकाणच्या कार्यक्रमात हजारो भक्तांनी लाभ घेतला.
कोरोना महामारीच्या दोनवर्षाच्या संकटानंतर या वर्षी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी हनुमान जन्मोत्सवासाठी गर्दी केली होती. शहरातील हनुमानगढ, हनुमान टेकडी, वजिराबाद भागातील मारोती मंदिरात आणि विविध ठिकाणच्या मंदिरात आज हनुमान चालीसा, हनुमान स्त्रोत्र, रुद्राभाषिक यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ठिक ठिकाणी महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड शहराचे तापमान 42 अंशावर असतांनाही रणरणत्या उन्हात भक्तांनी वाढत्या तापमानाची परवा न करता मंदिरात गर्दी केली होती. भक्तांसाठी विविध ठिकाणी थंडपेय आणि थंडपाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.