ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत एकाच खुन,एकावर जीवघेणा हल्ला;नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला प्रकार

नांदेड,(प्रतिनिधी)- जगात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दोन वर्षांनंतर साजऱ्या झालेल्या जयंतीला नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील चकमक फेम पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांच्या हद्दीत गालबोट लागले.रात्री नाईक महाविद्यालयासमोर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डान्स करण्याच्या कारणावरून एक खून आणि एकावर जीवघेणा हल्ला असा भयंकर प्रकार घडला आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बळीराम पूर भागातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरु झाली. मिरवणूक रात्री ९ वाजेच्या सुमारास नाईक कॉलेज समोर पोहचली.तेथे बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना त्रास देत नाचायला लागले.तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले.तेव्हा किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी भोकसले.तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यास पण अनेकदा चाकू मारून जखमी केले.या चाकू हल्ल्यात सचिन थोरात मरण पावला आहे.तसेच सुमेध वाघमारे जखमी झाला आहे.हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवर बसून पळून गेले आहेत.त्यांना अनेकानी पाहिले आहे.

सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यांनी सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथे उपचार घेत मध्यरात्री नंतर १२. १५ वाजता दिलेल्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिल विरुद्ध गुन्हा क्रमांक २३३/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,३४ आणि ऍट्रॉसिटी कायदा कलम ३(२)(व्हीए) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास डॉ.सिद्धेश्वर भोरे यांच्या कडे देण्यात आला आहे.

चकमक फेम,जबरदस्त,गुन्हेगारांचे कर्दनकाळ,एका वर्षा पेक्षा जास्त तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पद सांभाळणारे श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत हल्ला करून खून आणि जीवघेणा हल्ला करणाऱ्यांचे साहेब आता काय काय करतील हे दिसेलच. असो पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत खून आणि जीवघेणा हल्ला घडल्याने गालबोट नक्कीच लागले आहे.

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *