नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या एका 23 वर्षीय आरोपीला पकडून त्याच्याकडे सापडलेल्या खंजीरसाठी त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विमानतळ पोलीसांनी पुर्ण केली आहे.
पोलीस अंमलदार दारासिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी जिल्ह्यातून हद्दपार झालेला गणेश अमरसिंह ठाकूर रा.गुरूनगर नांदेड याचा शोध घेतला. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, बालाजी केंद्रे, बंडू कलंदर, गंगावरे हे सर्व 12 एप्रिलच्या रात्री 1.20 वाजता गुरूनगर भागात गेले. गणेश अमरसिंह ठाकूर (23) याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक खंजीर सापडला. गणेश अमरसिंह ठाकूरला नांदेड जिल्ह्यातून 22 फेबु्रवारी 2022 रोजी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्याचे उल्लंघन करून तो येथेच राहत होता. विमानतळ पोलीसांनी त्यास अटक केली आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा 4/25 आणि सह कलम महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे गुन्हा क्रमांक 127/2022 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार लोखंडे हे करीत आहेत.
