ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

नांदेडच्या सारस्वतांचा होट्टल महोत्सवात नृत्यांजलीसह स्वराभिषेक

ऐनोद्दीनच्या वेणुनादासह विजय जोशीच्या लोकरंगमध्ये

नांदेड जिल्ह्याच्या प्रतिभेचा दिला प्रत्यय

नांदेड (प्रतिनिधी) – ज्या स्थानिक कातळावर अप्रतिम शिल्पकलांना साकारून होट्टल येथील विविध मंदिरांच्या शिल्पकला साकारल्या त्या मंदिरातील ऐतिहासिक वैभवाला नांदेड जिल्ह्यातील सारस्वतांनी आपल्यातील अंगभूत कलेचा प्रत्यय देत होट्टल महोत्सवाचा दुसरा दिवस भारून टाकला. कर्नाटकच्या सिमेवर असलेले होट्टलचे पठार चैत्रातल्या उष्णतेला सावध घेत दिवस मावळता गणिक शीतलतेची छाया देऊन गेला. मंदिराच्या काठावर उभे राहिलेल्या रंगमंचाची दिवे जसजसे उजळत गेले तसे गणेश वंदनेने भक्तीरसाची जोड दिली.

बिलोलीचे भूमिपुत्र असलेले दिलीप खंडेराय यांचा महाविद्यालयीन जीवनापासून लोककला, लोकपरंपरा यातील फार जवळून अभ्यास राहिलेला आहे. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत त्यांनी गण, गवळण, गोंधळ हे महाराष्ट्रातील लोककला प्रकार प्रवाहित केले आहेत. होट्टल महोत्सवात दिलीप खंडेराय व संचाने आज बिलोली भागातील लुप्त पावत चाललेला लोककला प्रकार हलगी व सनई नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मीना सोलापूरे यांनी शिवस्तुती गीत सादर केले.

आपल्या पत्रकारितेसह संगिताची आवड जपत नांदेड येथील पत्रकार विजय जोशी यांनी आपल्या कलोपासनेला अंतर पडू  दिले नाही. यातील साधना सुरू ठेवत त्यांनी देशप्रेमासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले. “सैनिक हो तुमच्यासाठी” याचे राज्यभर 50 प्रयोग त्यांनी पूर्ण केले आहेत. नव्या पिढीपर्यंत महाराष्ट्राची लोकधारा पोहचावी यासाठी लोककलेला केंद्रभूत ठेवत त्यांनी लुप्त पावत चाललेल्या अनेक लोककलांना, कलावंतांना संधी देऊन कार्यक्रमांची निर्मिती केली. दिवाळी पहाट, पाडवा  पहाट अशा अनेक उपक्रमातून त्यांनी आपले गायनही सादर केले आहे. होट्टल महोत्सवात त्यांनी मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाद्वारे मराठी लोकरंगचा सुरेख प्रत्यय दिला.

कुमारी गुंजन पंकज शिरभाते हिचे व्हायोलिन वादन, किनवटच्या बोधडी येथील अंध विद्यालयातील राजेश ठाकरे यांनी महोत्सवातील कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. आपल्या वडिलांकडूनच व्हायोलिनचे धडे घेत कुमारी गुंजनने वेगळी अनुभूती होट्टल वासियांच्या प्रत्ययाला दिली. राजेश ठाकरे यांनी या महोत्सवाला आपल्या सुराभिषेकातून न्हावून काढले. मुळात मंदिराचा परिसर असलेल्या या काठाला त्यांच्या गायनाने भक्ती व भावरसाची अप्रतिम जोड देत महोत्सवाचा दुसरा दिवस सार्थकी लावला.

अर्धनारी नटेश्वराचे रुप म्हणून ज्या शिवाकडे पाहिले जाते त्याची आराधणा शिवपुष्पांजली, शिवस्तुती आणि शिवपदमद्वारे डॉ. भरत जेठवाणींचे शिष्य श्रृती पोरवाल, इशा जैन, अथर्व चौधरी, गौरी देशपांडे यांनी अप्रतिम सादरीकरण केले.

प्रारंभी सर्व कलावंतांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी डॉ खुशालसिंह परदेशी यांनी स्वागत केले. आमदार जितेश अंतापूरकर यांनी सर्व कलावंताचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन कवी बापू दासरी व आश्विनी चौधरी यांनी केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *