नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे सहाय्यक पोलीस निरिक्षक असतांना ओमकांत चिंचोळकर विरुध्द सुरू असलेल्या विभागीय चौकश्या हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवून दिल्या आहेत. 2017 ते आजपर्यंत दाबून ठेवण्यात आलेल्या या विभागीय चौकश्या आता पोलीस आयुक्त मुंबई संजय पांडे यांच्या समोर चालतील.
हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी खास दुतासोबत मुंबई पोलीस आयुक्तांना पाठविलेेले मार्च 2022 चे एक पत्र प्राप्त झाले. त्यात वेगवेगळे 11 संदर्भ लिहिलेले आहेत. यात 18 जुलै 2017 रोजी ओमकांत चिंचोळकर नियंत्रण कक्ष नांदेड येथे कार्यरत असतांना विजय मनुलकर रा.हदगाव यांनी फोन केला. त्यावेळी त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या बद्दल विनाकारण अर्वाच्च शिवीगाळ करून अश्लिल भाषेत बोलले होते. तसेच दि.4 डिसेंबर 2017 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप गुरमे हे पोलीस अधिक्षक कार्यालयात उपस्थित असतांना अनेक पोलीस अंमलदारांसमोर ओमकांत चिंचोळकरने त्यांना तुम्ही मला परत करणारे कोण, तु माजला आहेस टकल्या, तुझा माज मी जिरवतो, मला पाटील म्हणतात असे म्हणून धमकी दिली. यामुळे त्यांनी आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून सर्व पोलीस अंमलदारांसमोर अशोभनिय वर्तन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवता नियंत्रण कक्षाच्या डायरीमध्ये याची नोंद करून त्या डायरीचा फोटो सोशल मिडीयावर लोड केला होता. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केले आहे. म्हणून त्यांच्यावर कसुर ठेवण्यात आलेला आहे.
पुढे ओमकांत चिंचोळकरची बदली हिंगोली जिल्ह्यात झाली. म्हणून या चौकशींबाबत विभागीय चौकशी करण्यासाठी हिंगोली येथे कळविण्यात आले होते. नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयाने वेगवेगळ्या दिवशी त्या कसुर प्रकरणातील साक्षीदारांची यादी मागितली असता ती मिळाली नाही. दरम्यान सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी पोलीस निरिक्षक पदोन्नती प्राप्त केल्यानंतर त्यांना दि.4 मार्च 2021 रोजी मुंबई येथे बदलीवर सोडण्यात आले आहे. नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयाने मागील तीन वर्षात चौकशीसाठी मागण्यात आलेल्या त्रुटींचा अहवाल 21 फेबु्रवारी 2022 रोजी पाठवला आहे. त्यामुळे सदर विभागीय चौकशीची पुढील कार्यवाही करता आलेली नाही. ओमकांत चिंचोळकर विरुध्द हिंगोलीच्या आस्थापनेवरुन बदली झाल्याने आता ही प्राथमिक चौकशी आपल्या समक्ष पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर करीत असल्याचे या पत्रात लिहिले आहे. या पत्रासोबत 167 पाने आणि एक सीडी पाठविण्यात आली आहे. सोबतच आपल्या पत्राच्या प्रती हिंगोलीचे पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर यांनी गृहविभागातील कक्ष अधिकारी कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना पण पाठविल्या आहेत.
पोलीस दलात सर्वोच्च आदर असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी संजय पांडे हे सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्याकडे हा लेखाजोखा पाठविण्यात आला आहे. तेथे तरी या प्रकरणात योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
