नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस पथकाने पेट्रोलपंपाची 9 लाख 54 हजार 220 रुपये रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पकडल्यानंतर त्यांनी चार विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलपंपावर चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.दि.14 मार्च रोजी पद्मावती पेट्रोलपंपचे व्यवस्थापक दादाराव अशोक हाके हे चार दिवसांपासून पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम रुपये 9 लाख 54 हजार 220 ही एका बॅगमध्ये टाकून दुचाकी गाडीवर बसून मालेगाव येथील बॅंकेत जमा करण्यासाठी जात असतांना सकाळी 10 वाजेच्यासुमारास धामदरी पाटीजवळ त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीवरील तीन चोरट्यांनी त्यांना खाली पाडून त्यांची रक्कम लुटून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हाके खाली पडले नाहीत आणि 9 लाख 54 हजार रुपये रक्कम वाचली. तरी पण अर्धापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 60/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353 नुसार दाखल झाला.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात आपल्याला मिळालेल्या गुप्त माहितीवर अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांनी काम करण्यास सुरूवात केली. 30 मार्च रोजी हा 9 लाख 54 हजारांच्या चोरीचा प्रयत्न करणारे करंजी ता.वसमत जि.हिंगोली येथील असल्याचे समजले. तेंव्हा पोलीस निरिक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे, साईनाथ सुरवसे, पोलीस अंमलदार राजेश घुन्नर, संजय घोरपडे, होमगार्ड दिपक बल्लोड, सर्जेराव मुंगल हे करंजी ता.वसमत या गावी गेले. पोलीस पथकाला पाहताच संशय असलेले चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेंव्हा अर्धापूर पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले. त्यांची नावे सर्जेराव रोहिदास होळपदे (22) रा.करंजी, पवन माणिकराव डाकोरे (21) रा.पळसगाव ता.वसमत , लखन बालाजी दुधमागरे (21) आणि गोविंद उर्फ अतुल रमेश तुरेराव (23), राजू एकनाथ चव्हाण (24) तिघे रा.खांडेगाव ता.वसमत यांना पकडले. त्यांच्याकडून अशा जबरी चोऱ्या करतांना वापरलेल्या दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या पाच चोरट्यांनी लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निळा गावात वैशालीताई पावडे हा पेट्रोलपंप, पोलीस ठाणे आसेगाव जि.वाशिम येथील विटोळा भोयर येथील आनंदी पेट्रोलपंप, पोलीस ठाणे मानवत हद्दीतील रुद्री पाटीजवळील कैलास पेट्रोलपंप आणि पोलीस ठाणे महागाव हद्दीतील पेट्रोलपंपावर जबरी चोऱ्या करून फरार असल्याची माहिती सांगतांना अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी अर्धापूर पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.