नांदेड,(प्रतिनिधी)- कालबद्ध पदोन्नती नंतर वेतनाच्या थकीत रकमेचे बिल मंजूर करण्यासाठी पंचायत समिती मुखेडच्या आरोग्य सहायक आणि सहायक लेखाधिकारी अश्या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. एसीबीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सापळा यशस्वी केला.
२८ मार्च रोजी मुखेड पंचायत समिती कार्यालयातील एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की,त्यांची कालबद्ध पदोन्नती झाल्या नंतर थकबाकी वेतन बिल मंजूर करून देण्यासाठी ५ हजार लाचेची मागणी होत आहे.याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २९ मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी पंचासमक्ष केली. तेव्हा आरोग्य सहायक शेख शादूल यांनी स्वतःसाठी आणि सहायक लेखाधिकारी पेंडकर यांच्यासाठी अशी एकूण १० हजारांची लाच मागणी केली. पुढे यात तडजोड घडली आणि अखेर लाचेची रक्कम ६ हजार रुपये ठरली आणि ६ हजार लाचेची रक्कम स्वीकारली.लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.लाचेची रक्कम ६ हजार रुपये स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुखेड पंचायत समिती अंतर्गत चांडोळा प्राथमिक केंद्रातील आरोग्य सहायक आणि अतिरिक्त पदभार कारकून शेख शादूल हबीब साब (४९) यास तात्काळ ताब्यात घेतले.नंतर मुखेड पंचायत समितीचे सहायक लेखाधिकारी गजानन सूर्यकांत पेंडकर (४८) यास मुखेड येथिक ताब्यात घेतले.
शेख शादूल आणि गजानन पेंडकर यांच्या विरुद्ध लाचखोरी बाबत गुन्हा क्रमांक १९०/२०२२ नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करून दोघांना गजाआड करण्यात आले आहे.सदर सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे,अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण,पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक प्रकाश वांद्रे,पोलीस निरीक्षक शेषराव नीतनवरे,पोलीस अंमलदार हणमंत बोरकर,एकनाथ गंगातीर,प्रकाश श्रीरामे,नीलकंठ यमूलवाड यांनी पूर्ण केली