नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांच्यावरील जबाबदाऱ्या आणि त्यांची कर्तव्य संबंधीच्या तुलनात्मक विवेचनानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात हे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली वेतन निश्चिती राज्यातील प्रत्येक पोलीस घटकप्रमुखाने त्यांची वेतन निश्चिती करून सेवा पुस्तके वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी असे आदेश प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांनी दिले आहेत.
राज्याच्या गृह विभागाचे कक्ष अधिकारी गणेश गायकवाड यांनी 17 मार्च 2022 रोजी संचालक लेखा व कोषागारे यांना पत्र लिहुन पोलीस हवालदार या पदाची महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम 1981 मधील नियम 11(1)(ए) प्रमाणे वेतन निश्चिती प्रमाणित करून देण्याबाबत पत्र लिहिले होते. त्यामध्ये पोलीस नाईक ते पोलीस हवालदार ही पदोन्नती देतांना त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याची तुलनात्मक प्रमाणिकरण प्रत तयार करण्यात आली आणि त्यानुसार ती वेतन निश्चिती करून देण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यात कांही दोष असतील तर ते दोष दुरूस्त करून पोलीस नाईक ते पोलीस हवालदार या पदानंतर देण्यात येणाऱ्या वेतनाची निश्चिती करण्यात आली होती.
पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार यांच्या दहा कर्तव्याची तुलनात्मक तपासणी या वेतन निश्चितीत करतांना दोन्ही पदाच्या पोलीस अंमलदारांची कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या सुनिश्चित करण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार ती वेतन निश्चिती करण्यात यावी असे शासनाचे निर्देश होते.
अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांनी 28 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांनी पोलीस हवालदार या पदाची वेतन निश्चिती करून ती वेतन पडताळणी तपासणी पथकाकडून प्रमाणित करून अत्यंत जलदगतीने पुर्ण करायची आहे. आता पोलीस नाईक हे पदच संपविण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस हवालदारांची संख्या सुध्दा राज्यात वाढणार आहे.