नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे सुट्टीवर असतांना 26 मार्चपासून आयपीएलचा सट्टाबाजार जोरदारपणे सुरू झाला आहे. या काळात प्रभारी पोलीस अधिक्षक कोण आहेत याची माहिती देण्यासाठी कोणीच तयार नाही. पण आयपीएल सट्टाबाजार अत्यंत जोरात नांदेड जिल्ह्यात सुरू झाल्याची चर्चा आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे सुट्टीवर असतांना 26 मार्चपासून आयपीएल सट्टाबाजार सुरू झाला आहे. यामध्ये क्रिकेटची आवड असणाऱ्या अनेक युवकांची वाट लागण्याची तयारी आहे. क्रिकेटचा सट्टा युवा वर्गाला आवडतो. पण त्याचा परिणाम त्या युवा वर्गाच्या कुटूंबियांवर होतो. त्यामुळे संपुर्ण कुटूंब उध्दवस्त होते.
राज्याच्या प्रत्येक जिल्हा पोलीस दलात एक विशेष शाखा गुन्ह्यांवर नियंत्रण करण्यासाठी कार्यरत असते. त्यातील नांदेडची शाखा तर मागिल 27 महिन्यांपासून अत्यंत जोरदारपणे काम करत आहे. असंख्य गुन्हेगार या शाखेने गजाआड केले आहेत. अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या शाखेत अनेक वर्षापासुन ठाण मांडून बसलेले अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदार आहेत. त्यामुळे यांची गुन्हेगारी क्षेत्रावर मोठी पकड आहे. या पकडीचा उपयोग कसा होतो. हे तर देवच शोधू शकेल. पण गुन्हेगारीच्या संदर्भाने या शाखेने केलेली कामगिरी वाखाणण्यासारखी आहे.
पोलीस अधिक्षक सुट्टीवर असतांना प्रभारी पोलीस अधिक्षक पद कोणाकडे आहे याची माहिती प्राप्त झाली नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयात कोणीच हे सांगायला सुध्दा तयार नाही अशा परिस्थितीत या आयपीएल सट्टाबाजाराला परवानगी सुध्दा प्रभारी काळातच मिळाली असे मानावे लागेल. आयपीएल सट्टा सुरू राहिला तरी अनेकांची उपजिवीका त्याच्यावर चालते. त्यामुळे त्याला बंद करणे सुध्दा अभिप्रेत नाही. आयपीएल सट्टाबाजारातून अनेकांचे हात ओले होतात. ज्यांचे हात ओले होतात त्यांनाही आपले हात करण्याचा अधिकार आहेच.