घटनास्थळ बदलले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात 24 मार्च रोजी घडलेल्या अपघातात दोन जणांचा जीव गेला या प्रकरणात मयत व्यक्ती हे अवैध रेती उत्खनन करतात अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण त्यांचे काम सेंट्रींगचे आहे. असे या तक्रारीत दाखविण्यात आले आहे. पण करणार काय गुन्हा तर नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला ना एवढेच त्या मयतांचे भाग्य असे म्हणावे लागेल.
दि.24 मार्च 2022 रोजी हे उत्तरप्रदेश राज्यातील गाजीबाजीपुर जिल्ह्यात राहणाऱ्या भरत जयनारायण राजभर (28) ज्यांचा व्यवसाय सेंट्रींग काम असे तक्रारीत लिहिले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 मार्च रोजी ते त्यांचा साडू शिवकुमार शिवगोविंद राजभर व जवळचा नातेवाईक मनोजकुमार मनता हे सर्व रा.उत्तरप्रदेश राज्यातील लोक असर्जन नाक्यापासून विष्णुपूरीकडे पायी जात असतांना रात्री 11.45 वाजता टिपर क्रमांक एम.एच.40 वाय 3577 ने शिवकुमार व मनोजकुमारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर टिपर चालकानेच अंब्युलन्स बोलावून जखमी अवस्थेतील शिवकुमार व मनोजकुमारला दवाखान्यात नेले. पण ते मरण पावले होते. या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 176/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 279 आणि 304 (अ) हा 24 मार्चच्या सकाळी 05.19 वाजता दाखल केला. या गुन्ह्याचा तपास आदरनिय, कर्तव्यदक्ष, कर्दनकाळ, तोंडी आदेशाने कार्यरत पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कोरे यांच्याकडे देण्यात आल्याचे एफआयआरमध्ये पेनने लिहिले आहे. त्यावर टाईपिंगचे नाव पोलीस अंमलदार संजय विठ्ठलराव रामदिनवार असे आहे. ते पेनने खोडलेले आहे.
या तक्रारीमध्ये तक्रारदार भरतराजभर आणि अपघातात मरण पावलेले शिवकुमार व मनोजकुमार हे कोणत्या कंत्राटदाराकडे सेंट्रींगचे काम करतात हे लिहिलेले नाही. तसेच खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व कामगार अवैध रेती उत्खननाचे काम करतात. पण सेंट्रींगचे काम दाखवून यात काय साध्य झाले हा प्रश्न कांही जणांना विचारला असता अवैध रेती उत्खनन आणि अवैध रेती वाहतुक सुरूच आहे हे दिसेल म्हणून रेतीच्या कामाऐवजी सेंट्रींगचे कामगार मरण पावल्याचे या तक्रारीत लिहिलेले आहे. आजही कोणत्याच कंत्राटदाराने हे कामगार माझ्याकडे काम करत होते आणि ते सुध्दा सेंट्रींगचे काम करत होते असे म्हटलेले नाही. ज्या टिपरने धडक दिली त्या टिपरमध्ये काय साहित्य भरलेले होते. याचाही उल्लेख या तक्रारीत करण्यात आलेला नाही. सर्वसाधारण पणे टिपर या वाहनाचा उपयोग गौण खनिज वाहतुकीसाठीच होतो असे मानले जाते. आजच्या परिस्थितीत नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन कामगार मरण पावले असतांना कमीत कमी गुन्हा तर दाखल केला. यापेक्षा जास्त अपेक्षा पण काय करायला हवी?
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या टिपरने या दोन कामगारांचा मृत्यू झाला. त्या टिपरमध्ये रेतीच भरलेली होती. एवढेच नव्हे तर अपघात झालेले घटनास्थळ सुध्दा काळेश्र्वरजवळ असतांना घटनास्थळ मुख्य रस्त्यावर दाखवले आहे. सोबतच ज्या रेती माफियाची ही गाडी होती ती राजकीय संबंध असलेल्या आणि सध्या राजकीय दबाव असलेल्या मोठ्या नेत्याशी संबंधीत आहे. यावरून अखेर गुन्हा दाखल केला याचे धन्यवाद नांदेड ग्रामीण पोलीसांना देण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नाही.