नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी 50 लाखाच्या बॅग चोरीतील दोन आरोपींना हस्तांतरण वॉरंटवर आणि एकाला गुजरात मध्ये पकडून स्थानिक गुन्हे शाखेने नांदेडला आणले आहे. या तीन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी 30 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. स्थानिक गुन्हा शाखेला या प्रकरणातील अजुन 5 आरोपी पकडायचे आहेत.
दि.15 डिसेंबर 2021 रोजी शहरातील बाफना टी पॉईंट जवळील बॅंक ऑफ बडोदाच्या समोरून भोकर येथील एका खाजगी कॉटन कंपनीचे 50 लाख रुपये चोरीला गेले. या ठिकाणी प्राप्त असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक माणुस येतो चार चाकी गाडीच्या उघड्या काचातून डावीकडच्या बाजूने 50 लाखांची बॅग काढतो त्याला घेवून जाण्यासाठी दुसरीकडून एक दुचाकी येते, बॅग घेतलेला चोर दुचाकीवर बसतो दुचाकीवरून बॅगसह खाली पडतो पण ती बॅग घेवून ते दोन्ही चोर पसारच होतात असे दिसते. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 307/2021 दाखल झाला. याची तक्रार चार चाकी वाहनचालक सटवा सुर्यवंशी यांनी दिली.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांचे सहकारी यांनी या चोरट्यांचा माग काढला हे चोरटे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील आहेत. याचा शोध लागला. तांत्रिक मदतीने सध्या हे गुन्हेगार गुजरातमध्ये आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गुजरात येथे गेले होते. पण गुजरात पोलीसांनी नांदेड पोलीस पोहचण्याअगोदरच या चोरट्यांना गजाआड केले होते. तेंव्हा नांदेड पोलीस परत आले आणि तेथे तुरूंगात असलेल्या दोघांविरुध्द हस्तांतरण वॉरंट घेवून पुन्हा गुजरातला गेले. यावेळी तेथे तुरूंगात असणाऱ्या चोरांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा तिसरा चोरटा नांदेड पोलीसांना तेथे सापडला. ही चोरांची टोळी कशा पध्दतीने चोरी करते याबद्दलचे सविस्तर वृत्त वास्तव न्युज लाईव्हने 17 मार्च 2022 रोजी दिवशी प्रसारीत केलेले आहे. नांदेड पोलीसांनी हस्तांतरण वॉरंटवर आणलेले दोन रमेश उर्फ पप्पु रवि थाला (26) रा.शंकरपल्ली हैद्राबाद, राजेश प्रभू मेकाला (29) रा.शंकरपल्ली हैद्राबाद आणि तिसरा पकडलेला आप्पाराव वसंतम गोडेटी (47) रा.कावेली जि.नेल्लोर (आंध्रप्रदेश) या तिघांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उप निरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार शंकर म्हैसनवाड विलास कदम, संजीव जिंकलवाड, शंकर केंद्रे यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयातील अभिलेखानुसार प्रकाश नारायण मेकाला, दावीद उर्फ पौल अंजय्या यादगिरी बोनाला (मुदीराज), राजू मैसय्या नारबोयन्ना, मधु उर्फ महेश भास्कर झाला, रोसय्या बाबू उर्फ विजय बाबू वसंतम बोटेडी अशा पाच आरोपींना अद्याप पकडणे बाकी आहे. सरकारी वकील ऍड. ए.एम. सौदागर यांनी पकडलेल्या तिघांना पोलीस कोठडी देणे कसे आवश्यक आहे याचे सादरीकरण न्यायालयासमक्ष केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश प्रविण कुलकर्णी यांनी 50 लाखांची बॅग चोरी प्रकरणात तीन जणांना 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
https://vastavnewslive.com/2022/03/17/50-लाखांच्या-बॅग-चोरीचा-ग/