नांदेड(प्रतिनिधी)-हिंदुत्वाचा मुद्दा हा शिवसेनेचा श्र्वास आहे. आता जनतेला हे कळायला लागले आहे की, हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण आणि राजकारणासाठी हिंदुत्वाचा मुद्दा वापरणारे खरे कोण आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे सचिव खा.अनिल देसाई यांनी केले.
राज्यभरात शिवसेनेच्या 19 खासदारांमार्फत शिवसंपर्क अभियानाची तयारी सुरू आहे. त्यात खा.अनिल देसाई नांदेड जिल्ह्याच्या शिवसंपर्क अभियान दौऱ्यावर आले असतांना आज पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ.बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, आनंदराव बोंढारकर, धोंडू पाटील, डॉ.मनोज भंडारी, बबन बारसे, उमेश मुंडे, प्रकाश मारावार आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षीण आणि उत्तर, लोहा, कंधार, नरसी, नायगाव, किनवट हदगाव, भोकर या ठिकाणी शिवसेना संघटना बैठकी घेवून खा.अनिल देसाई पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी बोलतांना खा.अनिल देसाई पुढे म्हणाले, शिवसेनेचा मुख्य श्र्वास हिंदुत्व हा मुद्या आहे. जनतेला आता हे कळायला लागले आहे राजकारणासाठी हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी राजकारण यातील फरक काय आहे. शिवसेनाच खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव पाळणारा राजकीय पक्ष आहे. संसदेमध्ये 19 खासदारांच्या तुलनेत शिवसेेनेला आपले प्रश्न मांडण्यासाठी वेळ मिळतो त्या अनुरूप जेवढा वेळ मिळतो त्या किमी शब्दांमध्ये शिवसेनेचे खासदार आपले प्रश्न प्रभावीपणे मांडतात. जिल्ह्याच्या दौऱ्यात शिवसैनिकांनी कोणते नांदेड जिल्ह्याचे प्रश्न आपल्यासमोर आणले असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचे उत्तर देण्याऐवजी युक्रेनमधून परत आलेल्या वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी काय करता येईल यावर खा.देसाई बोलले.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेना प्रबळपणे उतरले आणि जिंकेल असा विश्र्वास खा.अनिल देसाई यांना वाटतो. शिवसेना संपर्क मोहिम ही आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कल्पनेप्रमाणे खासदारांच्या नेतृत्वात सुरू आहे. परंतू शिवसेना संपर्क अभियान ही जुनीच परंपरा आहे. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी बदलण्यासंदर्भाने वेगवेगळे विषय सांगून खा.अनिल देसाई यांनी मोघम उत्तरे दिली.
पत्रकार परिषदेत उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सामनाचे प्रतिनिधी अनिकेत कुलकर्णी यांचा खा.अनिल देसाई यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. सोबतच अनिकेत कुलकर्णी यांनी सर्व पत्रकारांच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खा.अनिल देसाई यांचे स्वागत केले.
सर्व नेते माणसेच आहेत
राजकीय पक्षांबद्दल जनतेसमोर जोरजोरात भांडणारी नेते मंडळी पडद्यामागे एकच असतात असा प्रश्न विचारला असतांना प्रत्येक राजकीय पक्षाची नेते मंडळी त्या पक्षाचे विचार जाहिरपणे मांडतात त्यात विरोधही असतो पण शेवटी नेतेमंडळी सुध्दा माणसच आहेत. म्हणून एकत्रितपणे चहा सुध्दा पितात असे खा.अनिल देसाई म्हणाले.