नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेचा विनयभंग करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणार्या एकाला मुखेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.पी.त्रिभुवन यांनी पाच वर्ष सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका महिलेचा विनयभंग शंकर लक्ष्मण नरेवाड या व्यक्तीने केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाची पिडा त्या महिलेच्या मनात बसली आणि तिने स्वतःवर रॉकेल टाकून जाळून घेतले. महिलेने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबानुसार मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात शंकर लक्ष्मण नरेवाड याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक २७/२०१६ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ३५४, ३५४ (अ) नुसार दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक बी.डी.तुंकलवाड यांनी शंकर लक्ष्मण नरेवाड या आरोपीस अटक करून पुराव्यांची साखली तयार करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
मुखेड न्यायालयातील सत्र खटला क्रमांक २०/२०१६ नुसार शंकर लक्ष्मण नरेवाड विरुध्द खटल्याची प्रक्रिया सुरू झाली तेंव्हा न्यायालयात १० साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश एन.पी.त्रिभुवन यांनी आज दि.२२ मार्च २०२२ रोजी सत्र खटला क्रमांक २०/२०१६ चा निकाल देतांना शंकर लक्ष्मण नरेवाडला पाच वर्ष सक्तमजुरी व ३ हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ऍड.सोमनाथ वरपे यांनी मांडली. त्यांना पोलीस अंमलदार माधव कागणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून मदत केली. आज झालेल्या शिक्षेच्या संदर्भाने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांनी मुक्रामाबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संग्राम जाधव, पोलीस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे, गजानन कागणे यांचे कौतुक केले आहे.