नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.21 मार्च 2022 रोजी सायंकाळी वसरणी शिवारातील नाल्यात सापडलेल्या अनोळखी युवकाच्या प्रेताची ओळख पटली आहे. अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा खून करण्यात आला आहे. अत्यंत गुप्तपणे या सर्व प्रकरणाची तपासणी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
21 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास एका 25 वर्षीय वयोगटातील युवकाचे प्रेत सापडले. त्याच्या शरिरावर फक्त एक निळ्यारंगाची पॅन्ट होती. त्याची शरिरावर अनेक जखमा दिसत होत्या. वास्तव न्युज लाईव्हने या अनोळखी युवकाचे प्रेत सापडल्याची बातमी अत्यंत जलदगतीने प्रसारीत केली होती. जनतेला या प्रकरणी पोलीसांनी आवाहन केले होते की, मयताची ओळख असेल तर त्याबाबतची माहिती पोलीस विभागाला द्यावी.
आज दि.22 मार्च रोजी प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार काल अनोळखी मयत असलेला युवक गजानन ठाकूर (25) रा.सांगवी हा आहे. आनंदनगर भागात तो एका पानटपरीवर काम करतो. वैद्यकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गजानन ठाकूरचा खून तीन दिवसापुर्वी झाला असेल. याबाबत कांही युवकांनी गजानन ठाकूरला धुळवडीच्या दिवशी, 18 मार्च 2022 रोजी मारहाण केल्याची माहितीही प्राप्त झाली आहे. 19 मार्च रोजी छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी या गाण्यातील वाक्याप्रमाणे मारहाण करणाऱ्यांनीच गजानन ठाकूरला बोलावून घेतले आणि त्याच्यासोबत मद्याचा आस्वाद घेतला. गजानन ठाकूरकडे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.झेड.6244 होती. 19 तारेखपासून गजानन ठाकूरचा मोबाईल बंद होता. 21 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता त्याचा मृतदेह सापडला. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केलेला आहे. यामध्ये वैद्यकीय पुरावा आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होतील.19 तारेखेच्या रात्रीपासून गजानन ठाकूरचे प्रेत उघड्यावर पडलेले असल्याने 20 तारखेचा पूर्ण दिवस आणि 21 तारेखा पुर्ण दिवस ते प्रेत उघड्यावरच होते. त्यामुळे या प्रेतावर कडक उन्हाचा प्रभाव सुध्दा झाला आणि त्यामुळे ते प्रेत सडले होते.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्याकुशल मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माननिय श्री द्वारकादासजी चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात कांही पोलीस पथके या प्रकरणावर बारकाईने तपासणी करीत आहेत. गजानन ठाकूरचा खूनच झाला असेल तर तो काय झाला, कारण काय याचा शोध होईल आणि गजाननचे मारेकरी गजाआड केले जातील.
