नांदेड,(प्रतिनिधी)- महिला ग्राम पंचायत सदस्याचे जात पडताळणी समितीने जातीचे प्रमाणपत्र एकदा अवैद्य ठरवल्यानंतर खोटे कागदपत्र तयार करून दुसऱ्यांदा जात प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या त्या महिलेविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा दक्षता समितीचे पोलीस उप अधीक्षक नरसिंग आकूसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत सदस्य शेषाबाई लालप्पा कांबळे (माहेरचे नाव) तसेच शेषाबाई मारोतीराव मोरे (सासरचे नाव) यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने २८ जानेवारी २०२२ रोजी अवैद्य ठरवले होते.त्यानंतर महिला सदस्याने नवीन इ मेल आयडी,नवीन भ्रमणध्वनी क्रमांक,नवीन रहिवाशी पत्ता आधारे बनावट प्रवेश निर्गम, बनावट ओळखपत्र,खोटे शपथपत्र,खोटे शिक्के बनवून नवीन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव तयार करून समिती कडून नवीन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले.
या तक्रारीनुसार विमानतळ पोलिसांनी महिला ग्राम पंचायत सदस्य शेषाबाई लालप्पा कांबळे (माहेरचे नाव) तसेच शेषाबाई मारोतीराव मोरे (सासरचे नाव) यांच्या विरुद्ध फसवणूक करणे,खोटे कागदपत्र तयार करणे,ते कागदपत्र खोटे असल्याचे माहित असतांना खरे आहेत असे भासवणे या सदरांखाली भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०,४६७,४६८,४७१ नुसार गुन्हा क्रमांक ९०/२०२२ दाखल केला आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.