होळी आणि धुलीवंदन निमित्त पोलीस अधिक्षकांच्या जतनेला शुभकामना
नांदेड(प्रतिनिधी)-आज फाल्गुन शुध्द पौर्णिमा म्हणजे होलीका दहन या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील जनतेला शुभकामना देतांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले की, या रंगांच्या सणामध्ये क्रोध, मोह, लोभ, अहंकार, भ्रष्टाचार आणि नकारात्मकता या सर्व दोषांना होलीकेत टाकून आनंद, प्रेम, उत्साह आणि उल्हास जनतेने जरूर मिळवावा पण आपल्या आनंदामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले आहे.
फाल्गुन शुध्द पौर्णिमा हा रंगांचा सण पुर्वीच्या काळात हा रंगांचा सण 15 दिवस चालत होता. पण आता धावत्या तांत्रिक युगात या सणाची कालमर्यादा ही कमी-कमी होत गेली. पण या सणाचा उत्साह नेहमीच कायम राहिला. या संदर्भाने पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, रंगांना घाबरु नका पण रंग बदलणाऱ्या लोकांपासून नक्कीच सावध राहा. आपला सण साजरा करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि त्या आनंदाचे संरक्षण करणे पोलीस दलाची जबाबदारी आहे. परंतू आपला सण साजरा करतांना त्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची जाणिव सर्वांनी ठेवावी नाही तर पोलीस दल त्यावर कायदेशीर उपाय योजना करण्यासाठी सुध्दा कटीबध्दच आहे. सप्तरंगांची उधळण करतांना त्यापासून इंद्रधनुष्य तयार होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा नाही तर रंगांची लय बिघडली तर सर्वकांही बेरंग होते. याची जाण ठेवा अशा शब्दांमध्ये पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नांदेड जिल्ह्यातील जनतेला होळी आणि धुलीवंदन या सणांनिमित्त शुभकामना दिल्या.
मोठा पोलीस फौजफाटा तैनात
नांदेड जिल्हा पोलीस जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक -01, अपर पोलीस अधिक्षक-02, उपविभागीय पोलीस अधिकारी-11, पोलीस निरिक्षक-28, सहाय्यक पोलीस निरिक्षक / पोलीस उपनिरिक्षक -142, महिला पोलीस अंमलदारांसह इतर सर्व पोलीस अंमलदार- 979, आरसीपी प्लॉटून-05, हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी-01, पुरूष गृहरक्षक-1150, महिला गृहरक्षक-250 असा पोलीस फौजफाटा होळी आणि धुलीवंदन या सणांसाठी तयार ठेवण्यात आला आहे.
