नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे एक दुकान फोडून चोरट्यांनी 73 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. बेळकोणी शिवारातून एका मोबाईल टॉवरचे 40 मिटर पॉवर केबल 20 हजार रुपयांचे चोरीला गेले आहेत. उमरगा ता.कंधार येथील सौर उर्जेचे 40 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले आहेत. भोकर येथील दोन शेतात चोरी करून चोरट्यांनी 14 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
दिलीप रंगनाथ दमकोंडवार यांची हदगाव येथे नांदेड रस्त्यावर ऋषीकेश ट्रेडींग कंपनी ही दुकान आहे. 15 मार्चच्या रात्री 11.30 वाजता हे दुकान बंद करून आपल्या घरी गेले. 16 मार्चच्या पहाटे 6 वाजता त्यांचे शटर तुटल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपासणी केली असता दुकानातील 73 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 89/2022 दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक पांढरे अधिक तपास करीत आहेत. सुनिल गोविंद भेदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मार्चच्या दुपारी 2 ते रात्री 9 वाजेदरम्यान बेळकोणी ता.बिलोली येथील मोबाईल टॉवरचे 40 मिटर पावर केबल, 20 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरले आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पठाण अधिक तपास करीत आहेत.
उमरगा (खो) ता.कंधार येथील ग्रामसेवक सचिन विष्णुकांत बिराजदार यांच्या तक्रारीनुसार कोणी तरी चोरट्यांनी 6 मार्च रोजी ग्रामपंचायतच्या टाकीवर चढून आतमधील सीडी-3 वॉल, लोखंडी पाईप सौर उर्जेचे खांब, बॅटरी आणि सोलार प्लेट असे 40 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहेत. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार टाकरस अधिक तपास करीत आहेत.
सोहन दत्ताराम शेट्टे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 मार्चच्या सायंकाळी 7 ते 16 मार्चच्या पहाटे दरम्यान त्यांच्या आणि त्यांचे शेजारी गंदेवार यांच्या शेतातून तीन अश्र्वशक्तीची मोटार 13 हजार रुपयांची आणि 500 फुट वायर 1750 रुपयांचे असा एकूण 14 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार शिंदे हे करीत आहेत.
