नांदेड(प्रतिनिधी)-एका मेन्स पार्लर दुकानामध्ये कामगारावर चार जणांनी हल्ला केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली. आज 13 मार्च रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी या चौघांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
12 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास वामनराव मंगल कार्यालयाच्या बाजुला पुर्णा रोडवरील वेलकम जेन्टस पार्लरमध्ये घुसून तेथे काम करणारे साहेब केरबा शिंदे यांच्या पाठीवर, पोटावर, छातीवर, दोन्ही बरगड्यांवर, दंडांवर, लोखंडी सळाईने मारून गंभीर दुखापत केली. याबाबत बालाजी निवृत्ती सोनटक्के यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सतिश उर्फ पापा मधुकर इंगोले (34) रा.गंगा कॉलनी, शिवराज उर्फ शिवा रंजित दळवी (27) रा.अष्टविनायक नगर, मयुर चंद्रकांत निरडे (20) रा.बी.ऍन्ड सी कॉलनी, प्रशांत प्रल्हाद कांबळे (28) रा.सहयोग नगर नांदेड या चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 324, 323, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 88/2022 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख नवाब यांच्याकडे देण्यात आला.
शेख नवाब आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार एम.डी.शेख,झगडे आणि इतरांनी यांनी गंभीर दुखापत करणाऱ्या चौघांना न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्या.मयुरा यादव यांनी या चौघांना दोन दिवस अर्थात 16 मार्च 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
