

नांदेड(प्रतिनिधी)-ज्येष्ठ पत्रकार सन्माननिय अनिकेत कुलकर्णी आपल्या चारोळी सांगतात की, ‘माहिती अधिकाऱ्याच्या अधिकार शाहीने रुग्णालयात दाखल बिचारा होकर्णे’ पण याच्याही पुढे जावून रुग्णालयात दाखल असलेल्या विजय होकर्णेच्या बंधूने शासकीय कामात अडथळा करणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज वजिराबाद पोलीस ठाण्यात दिल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. पण कोणताही पोलीस अधिकारी असा अर्ज आल्याच्या घटनेला दुजोरा मात्र देत नाही.
दि.13 मार्च रोजी श्री गुरू गोविंदसिंघजी सरकारी रुग्णालय नांदेड येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 30 पेक्षा जास्त बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातच छायाचित्रकार विजय होकर्णे आणि जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्यात जुंपली होती. विनोद रापतवार हे जिल्हा माहिती अधिकारी आहेत आणि विजय होकर्णे हे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात छायाचित्रकार आहेत. म्हणजे विनोद रापतवार हे कार्यालयाचे प्रभारी अधिकारी आहेत. त्या कार्यक्रमात विनोद रापतवारच्या मनाप्रमाणे काही काम झाले नसेल म्हणून विनोद रापतवार विजय होकर्णे यांना काही बोलले असतील.पण विजय होकर्णे कसे ऐकणार कारण ते नांदेडचे भुमिपूत्र आहेत आणि त्यांच्या खांद्यावर तर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची धुरा आहे. पण या जुंपाजुंपीच्या दरम्यान त्यांचा बी.पी.शुट झाला आणि 57 वर्ष वय असलेल्या विजय होकर्णेवर हा बी.पी.शुट भारी पडला आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शल्य चिकिसक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी पुढील उपचारासाठी एका नामवंत, ख्यातीवंत रुग्णालयाकडे त्यांना पाठवले. आज 14 मार्च रोजी सुध्दा ते उपचारच घेत आहेत. दोन शासकीय व्यक्ती विनोद रापतवार आणि विजय होकर्णे यांच्यात जुंपलेल्या घटनेची चर्चा काल पासूनच सुरू होती.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय होकर्णे यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करून त्यांचे बंधू आणि दुरदर्शनचे प्रतिनिधी भारत होकर्णे यांनी एक अर्ज वजिराबाद पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यामध्ये त्यांनी मी आणि विजय होकर्णेच्या पत्नी सौ.अरुणा विजय होकर्णे दोघे मिळून मागणी करीत आहोत की, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार विरुध्द सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करावा. याबाबत पोलीस विभागाकडे माहिती विचारली असता कोणताही पोलीस अधिकारी असा अर्ज आल्याबद्दल दुजोरा देत नाही. म्हणून या अर्जातील शब्दांची सत्यता जाणू घेण्यासाठी ऍड.रामसिंघ मठवाले यांच्याकडे विचारणा केली असता भारतीय दंड संहितेतील कलम 353 हे सरकारी कामात अडथळा आणण्यासाठी अस्तित्वात असल्याचे त्यांनी सांगितले. पण सोबतच अर्जदार हा स्वत: सरकारी व्यक्ती असावा असे सांगितले. विरोधी हा खाजगी व्यक्ती असावा असे सांगितले. आता भारत होकर्णे हे दुरदर्शनचे प्रतिनिधी असले तरी ते जिल्हा माहिती कार्यालयातील शासकीय व्यक्ती नाहीत. तसेच त्यांचे शासकीय कर्मचारी बंधू विजय होकर्णे यांच्यासोबत अर्वाच्च भाषेत,अपमानास्पद वागणूक देणारा व्यक्ती सुध्दा कोणत्या गडीवरचा नोकर नाही. तर ते सुध्दा शासकीय अधिकारी आहेत. म्हणून ऍड. रामसिंघ मठवाले यांनी आपले मत व्यक्त केले की, भारत होकर्णेचा तक्रारी अर्ज निषप्रभ आहे.
जेष्ठ पत्रकार श्री अनिकेतजी कुलकर्णी यांनी या घटनेवर लिहिलेली एक चारोळी बोलकी आहे. अनिकेतजी लिहितात, ‘माहिती अधिकाराच्या अधिकार शाहीने रुग्णालयात दाखल बिचारा होकर्णे’ काकांचे ही चारोळी प्रभावशाली आहे असे मानले तर जिल्ह्यात कार्यरत प्रत्येक अधिकाऱ्याच्याविरुध्द असे तक्रारी अर्ज दररोजच येतील असे लिहिले तर ते चुक ठरणार नाही. आता ही आम्ही आमच्या हरी जवळ प्रार्थना करीत आहोत की, विजय होकर्णे अत्यंत बलदायी आरोग्य घेवून पुन्हा मैदानात यावे आणि मग विचारावा जाब आणि तो सुद्धा कायद्याच्या चौकटीत असायला हवा.