नांदेड(प्रतिनिधी)- 9 मार्च रोजी देगलूर नाका परिसरात फळ विक्रेता अब्दुल युसूफ कादर यास जखमी करून एक व्यक्ती पळून गेला होता. 9 मार्चच्या रात्री अब्दूल युसूफ कादरचा मृत्यू झाला. इतवारा पोलीस ठाणे गुन्हा शोध पथकाने आज त्या मारेकऱ्याला शोधले आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
9 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अब्दुल युसूफ कादर हा फळ विक्रेता युवक (20) आपली फळांची गाडी घेऊन जात असताना पाठीमागून त्याच्या पाठीत खंजीर खुपसून एक व्यक्ती पळून गेला. तसा तो त्याच्या ओळखीचा होता, पण त्याचे नाव त्याला माहित नव्हते. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हा भारतीय दंड संहितेच्या 326 नुसार दाखल झाला. त्याचा क्रमांक 44/2022 असा आहे. 9 मार्चच्या रात्री जखमी अवस्थेतील अब्दुल युसूफ कादरचा मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात भारतीयदंड संहितेचे कलम 302 वाढले. पोलिसांनी हल्लेखोर पळून गेलेल्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांनी एका व्यक्तीला त्यातून वेगळे केले आणि तोच मारेकरी आहे, या प्रमाणे त्याचा शोध सुरू झाला. इतवारा पोलिसांनी जनतेला सुद्धा आरोपी शोधण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले होते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार इतवारा पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सय्यद महेबुब, गणेश गोठके, पोलीस अंमलदार राजेश सिटीकर, विक्रम वाकडे, हबीब चाऊस, ज्ञानेश्वर कलंदर, भोकरे,कस्तुरे, दासरवाड आणि साबे यांनी या प्रकरणातील संशयीत असलेल्या इम्रान खान हुसेन खान (30) रा. रहमतनगर यास ताब्यात घेतले आहे. या मारेकऱ्यानेच अब्दुल युसूफ कादरवर जीवघेणा हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. 48 तासांच्या आत मारेकऱ्याला शोधणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीखक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.