नांदेड(प्रतिनिधी)-सोनाटा आणि टायटन या नामांकित कंपनीच्या घडाळ्यांचे बनावट घड्याळ आणि सुटेभाग विक्री करणाऱ्या एका दुकानावर स्थानिक गुन्हा शाखेने छापा टाकून तेथून 2 लाख 36 हजार 750 रुपयांची बनावट घड्याळे आणि सुट्टेभाग असा मुद्देमाल जप्त केला आहे.
गौरव शामनारायण तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कंपनीचे परिक्षक चंदनसिंह किशनसिंह कहाटे यांना माहिती मिळाली की, नांदेडमध्ये टायटन कंपनीच्या वस्तुंची नक्कल करून त्याची विक्री होत आहे. त्यानुसार आम्ही नांदेडला आलो आणि आमच्याकडे टायटन कंपनीने दिलेल्या अधिकारानुसार तपासणी करण्याचे अधिकार पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दाखविले. तेंव्हा त्यांनी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, विलास कदम आणि शंकर केंद्रे यांना आमच्या मदतीसाठी पाठविले. 7 मार्चच्या सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास रुबी वॉच सेंटर, जालनेकर मार्केट एम.जी.रोड नांदेड येथे पोहचलोत आणि दुकानातील व्यक्ती मुनाफ अब्दुल खुदूस खाकू यास आपला परिचय देवून दुकानात तपासणी केली. तेथे टायटन कंपनीचे 10 मनगटी घड्याळ आणि त्यावर लावले जाणारे साहित्य सापडले. या साहित्याची किंमत 2 लाख 36 हजार 750 रुपये आहे.
या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी कॉपी राईट कायदा 1957 कलम 63,65 आणि ट्रेडमार्क कायदा कलम 103, 104 प्रमाणे गुन्हा क्रमांक 42/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रमेश गोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
