नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील दक्षता पथकाने जिल्हा दक्षता पथकाचे प्रमुख जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भोकरफाटा येथे 700 लिटर बायोडिझेल पकडले. पण दक्षता पथकाला आणि त्यांच्या प्रमुखांना नांदेड शहरातील नदी पलिकडच्या भागात जुन्या आरटीओ ऑफीसजवळ बायोडिझलचा सुरू असलेला धंदा माहित नाही काय? असा प्रश्न भोकरफाटा येथे पकडलेल्या बायोडिझेल नंतर समोर आला आहे.
काल दि.28 फेबु्रवारी रोजी राज्य दक्षता पथक यांनी भोकर फाटा येथे एका बायोडिझेल विक्री केंद्रावर छापा टाकला. या ठिकाणी 4 गाड्या पकडल्या. बायोडिझेल मात्र 700 लिटरच मिळाले. या छाप्यात मुंबई येथील कानुराज बगाटे आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या मार्गदर्शनात गणेश बेल्लाळे, लतिफ पठाण, उज्वला पांगरकर, मारोतराव जगताप, संतोष शिंदे, सुशील साळसकर, संदीप आचरेकर, अमोल बुरटे, महेश देशपांडे, संजय खिल्लारे, चंद्रकांत महाजन यांच्यासह अर्धापूरचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. हा छापा ज्या माहितीच्या आधारावर दक्षता पथकाने टाकला. तो माहितगार खरा व्हिस्टलब्लोअर आहे काय? याची खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी करायला हवी. कारण या ठिकाणी फक्त 700 लिटरच बायोडिझेल सापडले. मागे कांही महिन्यापुर्वी बीड जिल्ह्यातील एका सहाय्यक पोलीस अधिक्षकाच्या पथकाने दोन टॅंकर भरलेले म्हणजे 20 हजार लिटर बायोडिझेल आणि एक रिकामा टॅंकर असे तीन टॅंकर नांदेड येथून नेले होते. मग 700 लिटरवर कार्यवाही करतांना ज्या व्हिस्टल ब्लोअरने ही कार्यवाही करण्यासाठी मी किती चांगला व्यक्ती आहे हे दाखवले. त्याची सत्यता जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी तपासायला हवी. अर्धापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 52/2022 दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा आकडा 32 लाख 33 हजार 150 रुपये झाला आहे. पण या 32 लाखांमध्ये बायोडिझेलची किंमत फक्त 52 हजार 500 रुपये होते. बाकी सर्व गाड्यांची किंमत आहे.
नांदेड शहरात नदीपलिकडे आरटीओ कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या थोडे पुढे गेल्यावर जुने आरटीओ कार्यालय आहे. या जुन्या आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे सुध्दा बायोडिझेलचे मोठे विक्री केंद्र असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मग नांदेड जिल्हा दक्षता पथकाचे प्रमुख डॉ.विपीन यांना जुन्या आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे सुरू असलेल्या बायोडिझेल विक्रीची माहिती देण्यासाठी कोणी व्हिस्टल ब्लोअर सापडला नाही काय ? हा प्रश्न समोर आला आहे.
